Share Market Closing Bell : गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला (Share Market Closing Bell). सकाळच्या सत्रात शेअर बाजार वधारला होता. मात्र, त्यानंतर नफा वसुली सुरू झाल्याने बाजारात घसरण झाली. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 83 अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टीमध्ये (Nifty) 21 अंकांची घसरण झाली. दिवस संपला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 53,430 अंकांवर आणि निफ्टी 15,948 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात आज ऑटो, एनर्जी, फार्मा क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला. तर, बँकिंग, आयटी एफएमसीजी, रिअल इस्टेट, मेटल्स, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 28 शेअरमध्ये घसरण झाली. तर, 22 शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअरमध्ये खरेदी आणि उर्वरित 17 शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. नफा वसुलीमुळे दुपारी बाजारात घसरण सुरू झाली होती. मात्र, काही वेळाने बाजार सावरला.
आज बाजारात सन फार्माच्या शेअर दरात 2.39 टक्क्यांनी वाढ झाली. तर, कोटक महिंद्रामध्ये 1.61 टक्के, डॉ. रेड्डी लॅबमध्ये 1.60 टक्के, मारुती सुझुकीमध्ये 1.54 टक्के, रिलायन्स शेअर दरात 0.93 टक्के, टायटनमध्ये 0.83 टक्के, नेस्लेमध्ये 0.51 टक्के, टाटा स्टीलच्या दरात 0.39 टक्क्यांनी वाढ झाली.
दरम्यान, आज सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटात तेजीचे संकेत दिसले. बाजार उघडताच 174 अंकांनी सेन्सेक्स वधारला. तर, निफ्टीतही 52 अंकांनी वाढ झाली. अमेरिकेतील महागाईच्या उच्चांकाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: