मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्यात दिवशी आज देशांतर्गत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. आज दिवसभरातील व्यवहारात शेअर बाजारात जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसून आली. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 555.75 अंकांच्या तेजीसह 65,387.16 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) हा 181.50 अंकांच्या तेजीसह 19,435.30 अंकांवर बंद झाला.
आज दिवसभरातील व्यवहारात खरेदीचा जोर दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 44 कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा एल अॅण्ड टी, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर दुसरीकडे एनटीपीसीच्या शेअर दरात पाच टक्क्यांची तेजी दिसून आली.
आजच्या व्यवहारात मेटल्स क्षेत्रातील स्टॉक्समध्ये चांगली तेजी दिसून आली. जेएसडब्लू स्टील आणि टाटा स्टीलच्या दरात 3 टक्क्यांची तेजी दिसून आली. मारुती सुझुकीच्या शेअर दरात खरेदी दिसून आली. बँकिंग आणि आयटी सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
गुंतवणूकदारांचे चांगभलं
आज शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. आजच्या तेजीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल 312.43 लाख कोटींवर पोहचले. गुरुवारी, हेच बाजार भांडवल 309.59 लाख कोटी रुपये इतके होते. आज दिवसभरातील व्यवहाराच्याअंती 2.84 लाख कोटींची वाढ झाली.
2183 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी
आज मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3786 कंपन्यांचे व्यवहार झाले. त्यापैकी 2183 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1479 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. आजच्या व्यवहारात 281 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 22 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 8 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठले. तर, 3 कंपन्यांच्या शेअर दरांनी लोअर सर्किट लागले.
सुंगार्नर एनर्जीचा शेअर सुस्साट
पॉवर सेक्टरमधील कंपनी सुंगार्नर एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर दराला लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट लागले. आजच्या व्यवहारात 275.45 रुपयांचा दर गाठला. आयपीओ दरापासून 216 टक्क्यांची वाढ दिसून आली.
सुंगार्नर एनर्जी लिमिटेडच्या आयपीओ चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीचा आयपीओ 152.40 पटीने सब्सक्राइब झाला होता. आयपीओत कंपनीचा इश्यू प्राईस हा 83 रुपये होता. शेअर बाजारात लिस्टिंग होताना कंपनीचा शेअर 200 टक्क्यांहून अधिक दराने लिस्ट झाला.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)