मुंबई :  आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी शेअर बाजारात (Share Market Closing Bell) विक्रीचा जोर दिसून आल्याने सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. जागतिक पातळीवर कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला विक्रीचा सपाटा यामुळे बाजारात घसरण दिसून आली. आयटी सेक्टरमध्येही विक्रीचा जोर दिसल्याने शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 281 अंकांची घसरण दिसून आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (NSE Nifty) 55 अंकांची घसरण दिसून आली. 

आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा सेन्सेक्स 281.10 अंकांच्या घसरणीसह 64,869.92 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 55.10 अंकांच्या घसरणीसह 19,310.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 14 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

सेक्टरमध्ये काय चित्र?

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा जोर दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांकात 456 अंकांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, बँकिंग, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया सेक्टर आदींमध्येही घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमधील शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.  

इंडेक्‍स किती अंकांवर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex64,948.6665,175.3264,754.72-0.31%
BSE SmallCap35,283.3235,508.7035,208.32-0.23%
India VIX12.1412.4910.79-0.80%
NIFTY Midcap 10037,815.4038,003.2037,715.15-0.21%
NIFTY Smallcap 10011,683.3511,778.5011,657.90-0.53%
NIfty smallcap 505,312.405,356.055,290.30-0.54%
Nifty 10019,209.3519,273.1519,157.45-0.29%
Nifty 20010,235.6510,266.7010,210.70-0.28%
Nifty 5019,310.1519,373.8019,253.60-0.28%

 

गुंतवणूकदारांना 81 हजार कोटींचा फटका

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलामध्ये (Market Cap) घसरण दिसून आली.  आज झालेल्या व्यवहाराच्या अंती बाजार भांडवल 303.16 लाख कोटी इतके बाजार भांडवल झाले. गुरुवारी, 17 ऑगस्ट रोजी बाजार भांडवल 303.97 लाख कोटी रुपये इतके होते. याचाच अर्थ आजच्या घसरणीमुळे बाजार भांडवलात 81 हजार कोटींची घसरण झाली आहे. 

2086 शेअर्समध्ये घसरण 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी आजच्या व्यवहारात बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. आज 3748 कंपन्यांचे शेअर्स व्यवहार झाले. त्यापैकी 1527 कंपन्यांच्या शेअर्स दर वधारले. तर, 2086 कंपन्यांचे शेअर्स दर घसरले. 135 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. आज 198 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 36 कंपन्यांच्या शेअर दराने 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. 13 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठला. तर, 7 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले.