मुंबई : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएस (TCS) पुन्हा एकदा शेअर्स बायबॅक करण्याच्या विचारात आहे. याच संदर्भात बुधवारी टीसीएसच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शेअर बायबॅक करण्यावर चर्चा केली जाणार आहे. या आधीही टीसीएसकडून अनेकदा बायबॅक करण्यात आले आहे आणि हा बायबॅकचा आकडा देखील मोठा होता. त्यामुळे आता किती कोटींचे शेअर्स कंपनी बायबॅक करणार आहे याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.


बायबॅक म्हणजे काय?
साधारणतः गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊन त्यात गुंतवणूक करतात. पण बायबॅकमध्ये त्याच्या उलट असते. कंपनी गुंतवणूकदाराकडून एखाद्या विशिष्ट ठरवलेल्या किंमतीत शेअर्स खरेदी करतात. त्यामागचं कारण म्हणजे कंपनीकडे अतिरिक्त रोकड असते. जी कंपनी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरते किंवा तशी वापरण्याजोगी गरज नसेल तर अतिरिक्त रोकडच्या मदतीनं गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करुन स्वतःचा हिस्सा वाढवते. याचा फायदा गुंतवणूकदारांसह कंपनीच्या वाटचालीवर देखील होतो.


टीसीएस किती रुपयांना बायबॅक करु शकतं?
झी बिझनेस या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, टीसीएस जवळपास 16 हजार कोटीचं बायबॅक करु शकते. 2017 मध्ये बायबॅकच्या वेळी 18.8 टक्क्यांचं प्रीमियम दिलं होतं. 2018 मध्ये बायबॅकच्या वेळी 20.3 टक्क्यांचं प्रीमियम दिलं होतं. 2020 मध्ये बायबॅकच्या वेळी 18.9 टक्क्यांचं प्रीमियम दिलं होतं. 


प्रीमियम म्हणजे त्यावेळी बाजारात शेअरची सुरु असलेल्या किंमतीच्या तितक्या टक्के अधिक किंमतीने कंपनी शेअर विकत घेतले. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय याच्याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :