Share Market Closing Bell: नव्या वर्षात सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market) घसरण दिसून आली. आज बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही विक्रीचा जोर दिसून येत होता. त्यानंतर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 304 अंकांची घसरण दिसून आली. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (NSE Nifty) 51 अंकांची घसरण दिसून आली. मागील दोन दिवसात सेन्सेक्समध्ये 940 आणि निफ्टीमध्ये 240 अंकांची घसरण दिसून आली आहे. 


आज शेअर बाजारातील दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 304 अंकांच्या घसरणीसह 60,353 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 50.80 अंकांच्या घसरणीसह 17,992.15 अंकांवर बंद झाला. आज शेअर बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1667 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1705 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 145 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 


कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-विक्री?


ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, बँकिंग, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप  आणि स्मॉल कॅप शेअर दरात तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर 18 कंपन्यांचे शेअर दर घसरले. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 33 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, 17 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 


या शेअरमध्ये दिसली तेजी-घसरण


आजच्या व्यवहारात आयटीसीच्या शेअर दरात 1.91 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, एनटीपीसी 1.77 टक्के, एचयूएलमध्ये 1.75 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 1.27 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, बजाज फायनान्समध्ये 7.21 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 5.10 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 2.22 टक्के, इन्फोसिसच्या शेअर दरात 1.32 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


बाजारातील व्यवहाराची सुरुवात कशी?


BSE सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 60,847 वर उघडला. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 18,102 अंकांवर उघडला. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शेअर बाजार तेजीसह उघडल्यानंतर, बाजार काही काळासाठी निच्चांकी पातळीवर गेला आणि काही काळानं पुन्हा तेजीत परतला.