Titwala Crime News: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धानं लग्नाचा तगादा लावल्यानंतर संतापलेल्या आफताबनं रागाच्या भरात तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. तेव्हापासूनच देशभरात खळबळ पसरली होती. असाच काहीसा प्रकार टिटवाळ्यात (Titwala News) घडला आहे. लग्नासाठी तगादा लावल्यामुळे रागाच्या भरात प्रियकरानं मित्राच्या मदतीनं प्रेयसीवर तब्बल 35 वार करत तिची हत्या केली. 


प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्यानं प्रियकरानं आपल्या एका मित्रासोबत विविहित महिलेची 35 वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे उघडकीस आली आहे. मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती. टिटवाळ्यात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्यानं तिची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 


टिटवाळ्यातील गोवेली परिसरात 12 डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्रानं तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. 


टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकानं तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेजवळ तिचं आधार कार्ड सापडले होतं. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. रुपांजली जाधव असं महिलेचं नाव असून ते पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते. रुपांजली जयराजकडे लग्नासाठी तगादा लावत जयराजला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे जयराज संतापला होता. अखेर जयराजनं रुपांजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. जयराजनं रूपांजलीला दागिने घेऊन देतो, असं सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज आणि त्याचा मित्र सुरज घाटे यांनी  रुपांजलीवर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केली आणि तिथून पळून गेले. रुपांजलीचा काटा काढण्यासाठी त्यानं मित्रासोबत तिच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्यांनी उल्हासनगर येथून दोन चाकू देखील खरेदी केले होते. अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज आणि त्याचा मित्र सूरज या दोघांना अटक केली आहे.