मुंबई : या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. रेल्वे, पॉवर आणि बँकिंग स्टॉक्समध्ये खरेदीचा मोठा जोर दिसून आला. या खरेदीच्या जोराने दिवसअखेर बाजार वधारत बंद झाला. आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाने बँकिंग स्टॉक्समध्ये चांगलीच तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 333 अंकांच्या तेजीसह 66,599 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 93 अंकांच्या तेजीसह 19,819 अंकांवर स्थिरावला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने इंक्रीमेंटल सीआरआरचा निर्णय घेतल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली. इंक्रीमेंटल सीआरआरनुसार बँकांना त्यांच्याकडे असलेल्या रोख रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम आरबीआयकडे जमा करावी लागत असे. आता हा नियम मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, आयटी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर, मीडिया, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसला. आज पुन्हा, मिड कॅप निर्देशांक 383 अंकांच्या तेजीसह 40,977 अंकांवर स्थिरावला. तर, स्मॉल कॅप इंडेक्स तेजीसह बंद झाला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 मधील 32 कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले.
आजच्या व्यवहारात एनटीपीसीच्या शेअर दरात 2.65 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, टाटा मोटर्स 2.2 टक्के, लार्सनमध्ये 1.93 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.42 टक्के, भारती एअरटेल 1.02 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.85 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.82 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, आयटीसीच्या शेअर दरात 0.71 टक्क्यांची घसरण दिसून आली. विप्रोच्या शेअर दरात 0.58 टक्के, टेक महिंद्रामध्ये 0.54 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.82 लाख कोटींची वाढ
आज मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 8 सप्टेंबर रोजी 320.92 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल 319.10 लाख कोटी होते. अशाप्रकारे, आज BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
2043 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ
मुंबई शेअर बाजारात (BSE) आज तेजीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या अधिक होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,820 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2043 कंपन्यांच्या शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,650 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 127 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 326 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 15 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांचा 52 आठवड्यांचा नवीन नीचांका गाठला.