Foxconn Finds New Partner To Build Chip Plant in India: तैवानची कंपनी फॉक्सकॉननं (Foxconn) यापूर्वी वेदांतासोबतचा (Vedanta) करार तोडण्याची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं फॉक्सकॉननं म्हटलं होतं. मात्र, हा करार तोडण्याबरोबरच फॉक्सकॉननं असंही म्हटलं होतं की, वेदांतासोबतचा करार तुटला असला तरी भारतात गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू बदललेला नाही. दरम्यान, फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स बनवणारी कंपनी आहे. फॉक्सकॉन आयफोन आणि इतर ऍपल उत्पादनं असेंबलिंग (उत्पादन) साठी ओळखलं जातं. पण आपल्या व्यावसाय वाढवण्यासाठी आणि विविधता आणण्यासाठी फॉक्सकॉन आता चिप उत्पादनात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, तैवानचा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप ST मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स NV (STMicroelectronics NV) सोबत एकत्र येत भारतात सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारण्यासाठी काम करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, Foxconn आणि फ्रेंच-इटालियन STMicro यांनी मिळून भारतात 40 नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी एकत्र अर्ज करण्याची योजना आखली आहे. दोन्ही कंपन्या मिळून चिप बनवतील जी कार, कॅमेरा, प्रिंटर आणि इतर अनेक मशीनमध्ये वापरल्या जातील, अशी त्यांची योजना आहे. 


रिपोर्टमध्ये एका सूत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, भारत सरकारनं फॉक्सकॉनकडून STMicro सोबतच्या भागीदारीबद्दल अधिक माहिती मागितली आहे. फॉक्सकॉनची चिप बनवण्याचं तंत्रज्ञान असलेल्या इतर काही कंपन्यांशीही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, फॉक्सकॉन आणि एसटीमायक्रोनंही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.


तैवानचा भारतावर विश्वास


फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन यंग लिऊ म्हणतात की, भविष्यात कोणतेही मोठे बदल न झाल्यास भारत जगातील एक नवं उत्पादन केंद्र बनेल आणि त्यात तैवान भारताचा सर्वात विश्वासार्ह भागीदार असेल. मायनिंग किंग म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेडसोबत फॉक्सकॉनची भागीदारी नुकतीच तुटल्याचं समोर आलं आहे. ही भागीदारी तुटण्याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, ही भागीदारी तुटण्याचं महत्त्वाचं कारण फॉक्सकॉन किंवा वेदांत या दोघांनाही चिप उत्पादनाचा मोठा अनुभव नाही, हेच असल्याचं बोललं जात आहे. 


वेदांतासोबतचा करार तुटताच फॉक्सकॉननं भारतात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करणार असल्याचं सांगितलं होतं. फॉक्सकॉननं सांगितलं होतं की, भारत सरकारनं त्यांच्या सेमीकंडक्टर उत्पादन धोरणांतर्गत दिलेल्या प्रोत्साहनासाठी (PLI स्किम) अर्ज करण्याची योजना आखत आहे.


दरम्यान, तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीनं गुजरातमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी भारताच्या वेदांत समूहासोबतचा 19.5 डॉलर अब्ज गुंतवणुकीचा करार रद्द केला होता.


चिप कंडक्टर म्हणजे काय?


चिप कंडक्टर वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मानवी मेंदू म्हणून कार्य करते. सिलिकॉनपासून बनलेली सेमीकंडक्टर चिप म्हणजे, सेमीकंडक्टर आणि त्याचा वापर विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी केला जातो. डेटा प्रोसेसिंग केवळ सेमीकंडक्टर चिपद्वारे केली जाते. या कारणास्तव याला इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदू म्हणून संबोधलं जातं. आज ते कारपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये सर्रास चिप कंडक्टर्स वापरले जातात. गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चिप कंडक्टर्सच्याच मदतीनं हायटेक फीचर्स चालवले जातात.


सेमीकंडक्टर महत्वाचं का आहे?


सेमीकंडक्टर चिप्स आजच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा अत्यावश्यक भाग आहेत. संगणक आणि लॅपटॉपमध्ये डेटा स्टोअर करण्यासह स्मार्टफोनमध्ये संवाद आणि डेटा स्टोरेजसाठी याचा वापर केला जातो. मनोरंजन उद्योगात, सेमीकंडक्टर चिप्स डिजिटल कॅमेरे, टेलिव्हिजन आणि इतर उपकरणांमध्ये त्यांची कपॅसिटी आणि परफॉरमन्स वाढवण्यासाठी वापरले जातात. या चिप्सचा वापर ऑटोमोटिव्ह उद्योगात वाहनांमधील नियंत्रण आणि दळणवळण प्रणाली वाढविण्यासाठी केला जातो. जगातील अव्वल 5 सेमीकंडक्टर उत्पादक देशांमध्ये तैवान, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. सध्या चीनमध्ये सेमीकंडक्टर चिप्सना सर्वाधिक मागणी आहे.