Anil Ambani : निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांना शेअर बाजारातून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. अंबानींना 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत संचालक होण्यासही बंदी आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, रिलायन्स होम फायनान्स (RHFL) च्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे आणि दंड ठोठावण्यात आला. रिलायन्स होम फायनान्सवर 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली असून 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
SEBI ने जारी केलेल्या 222 पानांच्या अंतिम आदेशानुसार, अनिल अंबानी यांनी (Sebi has barred businessman Anil Ambani) RHFL अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांची उधळपट्टी केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी स्वत: निधीचा वापर केला, मात्र हा निधी कर्ज म्हणून दिल्याचे भासवले.
सेबीच्या आदेशाशी संबंधित काय घडलं?
- अशी कर्जे बंद करण्याच्या आणि कॉर्पोरेट कर्जाचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना संचालक मंडळाने दिल्या होत्या, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
- SEBI ने म्हटले आहे की, परिस्थिती पाहता, RHFL ला फसवणुकीत गुंतलेल्या व्यक्तींइतकेच जबाबदार धरले जाऊ नये. इतर संस्थांनी निधी वळवण्यास मदत केली.
- अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपये, अमित बापना यांना 27 कोटी रुपये, रवींद्र सुधळकर यांना 26 कोटी रुपये आणि पिंकेश आर शहा यांना 21 कोटी रुपयांचा दंड
- रिलायन्स युनिकॉर्न एंटरप्रायझेस, रिलायन्स एक्सचेंज नेक्स्ट आणि इतर कंपन्यांना निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी प्रत्येकी 25 कोटी रुपयांचा दंड
रिलायन्स इन्फ्रा शेअर्स जवळपास 14 टक्के घसरले
सेबीच्या बंदीनंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स पॉवर या कंपन्या घसरत आहेत. रिलायन्स इन्फ्रा सर्वात जास्त 14 टक्के, रिलायन्स होम फायनान्स 5.12 टक्के आणि रिलायन्स पॉवर 5.01 टक्के घसरला आहे.
अनिल 1983 मध्ये रिलायन्सशी जोडले गेले, वाटणी होताच व्यवसाय बुडाला
मुकेश अंबानी 1981 मध्ये आणि अनिल अंबानी 1983 मध्ये रिलायन्समध्ये सामील झाले. जुलै 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. मृत्यूपत्र त्यांनी लिहिलं नव्हतं. मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि अनिल अंबानी व्यवस्थापकीय संचालक झाले.नोव्हेंबर 2004 मध्ये पहिल्यांदाच मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या भावांमधील भांडण समोर आले. धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन कुटुंबात सुरू असलेल्या वादामुळे नाराज होत्या, त्यानंतर व्यवसायात फूट पडली.
दोघांमध्ये वाटणी जून 2005 मध्ये झाली, पण कोणता भाऊ कोणता कंपनी पाहणार याचा निर्णय 2006 पर्यंत झाला. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व्ही के कामत यांना या वाटणीत हस्तक्षेप करावा लागला होता. वाटणीनंतर मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल्सचा व्यवसाय मिळाला, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन पेट्रोल केमिकल्स कॉर्प लिमिटेड, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
धाकटा भाऊ अनिल यांच्या मालकीच्या RCom, Reliance Capital, Reliance Energy, Reliance Natural Resources सारख्या कंपन्या होत्या. मुकेश अंबानी नव्या उंचीला स्पर्श करत आहेत, पण अनिल यांच्या चुकांमुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या