Demat Account Nominee Deadline : सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. डिमॅट खाते (Demat Account) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) खात्यात नॉमिनी (वारस) नाव नोंदवण्यासाठीची डेडलाईन ही सहा महिन्यांनी वाढवली आहे. नॉमिनी नोंदवण्यासाठीची डेडलाईन (New Deadline for Nominee) ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती. आता ही मुदत सेबीने वाढवली आहे.
SEBI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आता डिमॅट खातेधारक 30 जून 2024 पर्यंत नॉमिनीचे नाव नोंदवू शकतात. त्याशिवाय, सेबीने फिजिकल सिक्योरिटी होल्डर्सना पॅन, नॉमिनी आणि केवायसी तपशील अपडेट करण्यास सांगितला आहे.
रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) डेटानुसार, सप्टेंबर 2023 अखेर सुमारे 25 लाख पॅन धारकांनी त्यांच्या म्युच्युअल फंड फोलिओमध्ये नावनोंदणी अपडेट केली नव्हती.
गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
सेबीच्या या निर्णयाचा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित करण्यात मदत करणे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करणे हा आहे. सेबीने आपल्या परिपत्रकात म्हटले की, गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी, बाजारातील सहभागींकडून मिळालेल्या शिफारशींच्या आधारे, डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड फोलिओसाठी नॉमिनी नोंदवण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौथ्यांदा वाढवली मुदत
सेबीने चौथ्यांदा नामांकनाची मुदत वाढवली आहे. बाजार नियामकाने सुरुवातीला जुलै 2021 मध्ये डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 ठेवली होती. यानंतर, 24 फेब्रुवारी 2022 रोजी, अंतिम तारीख सुमारे 1 वर्षासाठी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर, 26 सप्टेंबर 2023 ही नामनिर्देशित व्यक्ती जोडण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली.
>> डिमॅट अकाउंटला असे जोडा नॉमिनी
> नॉमिनी जोडण्यासाठी, सर्वप्रथम https://eservices.nsdl.com/instademat-kyc-nomination/#/login या संकेतस्थळाला भेट द्या.
> येथे तुम्हाला डीपी आयडी, क्लायंट आयडी, पॅन नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
> यानंतर, नॉमिनीचे नाव डिमॅट खात्यात जोडावे लागेल.
> नॉमिनीचे नाव कन्फर्म करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर शेवटचा OTP येईल, तो एंटर करा.
> यानंतर तुमच्या नामांकनाची प्रक्रिया पूर्ण होईल.
>> एकापेक्षा जास्त नॉमिनी असू शकतात का?
सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट खात्यात तीन व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून जोडली जाऊ शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडल्यास, तुम्हाला ते गुणोत्तर देखील टाकावे लागेल ज्यामध्ये खात्यात जमा केलेल्या शेअर्सची रक्कम विभागली जाईल.