SBI Net Profit : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने एक विक्रम केला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच स्टेट बँक ऑफ इंडियाने 17000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. यामुळं SBI च्या उत्पन्नात देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, SBI ने कोणत्या गोष्टींमधून हे पैसे कमावले? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बँकेने आपल्या तिमाही निकालांची माहिती शनिवारी शेअर बाजाराला पाठवली, यामध्ये खूप दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल-जूनमध्ये बँकेचा स्वतंत्र नफा म्हणजेच एकट्या बँकेचा निव्वळ नफा 17000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. SBI ने एप्रिल-जून तिमाहीत 17,035 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 16,884 कोटी रुपये होता. या काळात बँकेच्या उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली आहे.


कोणत्या मार्गाने बँकेनं कमवला नफा?


एसबीआयने शनिवारी शेअर बाजाराला माहिती दिली की जून तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 1,22,688 कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 1,08,039 कोटी रुपये होते. केवळ व्याजातून बँकेचे उत्पन्न 1,11,526 कोटी रुपये झाले आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीत ते 95,975 कोटी रुपये होते. SBI ने देखील आपल्या निकालात बँकेच्या NPA ची माहिती दिली आहे. बँकेचा एकूण एनपीए (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) तिच्याद्वारे वितरित केलेल्या एकूण कर्जाच्या केवळ 2.21 टक्क्यांवर आला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत तो 2.76 टक्के होता. त्याचवेळी, बँकेचा निव्वळ NPA जून 2024 च्या तिमाहीत 0.57 टक्क्यांवर घसरला, जो एका वर्षापूर्वी 0.71 टक्के होता.


एकूण नफ्यातही मोठी वाढ


एसबीआयकडे बँकिंग कामांव्यतिरिक्त इतरही अनेक कामे आहेत. जसे सिक्युरिटीज व्यवसाय किंवा कार्ड व्यवसाय. या सर्वांसह, SBI चा एकत्रित नफा एप्रिल-जून तिमाहीत 19,325 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 18,537 कोटी रुपये होते. तर एकत्रित आधारावर, जून तिमाहीत बँकेचे उत्पन्न वाढून 1,52,125 कोटी झाले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत  1,32,333 कोटी होते.


महत्वाच्या बातम्या:


भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; फक्त वयाची अट लागू, 'या' वयोमर्यादेत असाल, तर वाट पाहत बसू नका, झटपट अर्ज करा!