SBI FD Interest Rates: स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank of India) मुदत ठेवींवरील व्याजदरात 65 आधार अंकांची वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) नुकतीच रेपो दरात (Repo Rate) 35 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानंतर आता एसबीआयनं एफडीवरील व्याजदरात वाढ (Increase Interest Rate on FD) केली आहे. स्टेट बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एफडीवरील व्याजदरात 25 ते 65 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर (Fixed deposit) लागू होणार आहे. नवे दर आज (मंगळवार) 13 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. यापूर्वी SBI नं 22 ऑक्टोबर रोजी रिटेल मुदत ठेवींवरील (Retail Term Deposit) व्याजदरात वाढ केली होती.
स्टेट बँकेनं 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक वर्ष ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर 6.10 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. त्यात 75 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
दोन वर्ष ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. तीन आणि पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रकमेवर आता व्याजदर 6.25 टक्के करण्यात आला आहे. तसेच, पाच ते दहा वर्षांच्या रकमेवर व्याजदर 6.25 टक्के करण्यात आला आहे. हे व्याजदर नव्यानं ठेवल्या जाणाऱ्या मुदत ठेवींसाठी आणि पूर्ण झालेल्या खात्यांच्या नूतनीकरणासाठी लागू होतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे. तसेच, SBI VCare ठेव योजना 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ TD विभागाच्या तुलनेत 50 bps जास्त व्याजदर मिळेल.
ऑक्टोबरमध्ये केलेली व्याजदरात वाढ
एसबीआय बँकेनं यावर्षी ऑक्टोबरमध्ये देखील दोन कोटींपेक्षा कमी एफडीच्या व्याजदरांत वाढ केली होती. त्यात 0.10 टक्के किंवा 0.20 टक्के वाढ करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही एफडी योजनांवर कमाल 7.65 टक्के व्याज दिलं जात आहे.