मुंबई : भारतीय शेअर बाजारानं काल चांगली कामगिरी केली आहे. रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 13.6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. आरवीएनएलचा शेअर कालच्या इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये 378.70 रुपयांपर्यंत पोहोचला होता. बाजार बंद झाला तेव्हा शेअर 11.86 टक्क्यांच्या तेजीसह 372.90 रुपयांवर बंद झाला. आरवीएनएलच्या शेअरमध्ये तेजीचं कारण कंपनीला 550 कोटींचं नवं कंत्राट मिळाल्याची माहिती समोर येणं हे होतं.


आरवीएनएलला हे कंत्राट रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (कर्नाटक) यांच्याकडून मिळालं आहे. बंगळुरुतील उपनगरीय रेल्वे प्रोजेक्ट कॉरिडॉर 4 ए  वर नऊ रेल्वे स्टेशन उभारणीचं काम आरवीएनएलला मिळालं आहे. यामध्ये एक एलिवेटेड स्टेशन उभारलं जाणार आहे. तर, आठ ग्रेड स्टेशनचा समावेश आहे. या स्टेशनच्या निर्मितीसाठी सिव्हील, स्ट्रक्चरल, एंट्री/ एक्झिट स्ट्रक्चर, स्टील पादचारी पूल,आर्किटेक्चरल फिनिशिंग सह इतर कामं होतील. यामध्ये डिटेल डिझाईन आणि इंजिनिअरींगचा समावेश होतो. आरवीएनएला काही दिवसांपूर्वी ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 404.40 कोटींचं कंत्राट देखील मिळालं आहे. हा प्रकल्प कोरापूट-सिंगापूर रोड प्रकल्पाशी संबंधित आहे. 


कंपनीची तिसऱ्या तिमाहीत कामगिरी कशी होती?


आरवीएनएलने 14 फेब्रुवारीला तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यामध्ये कंपनीचा नफा 13.1 टक्क्यांनी वाढून 311.6 कोटींवर पोहोचला आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 358.6 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल 2.6 टक्के घटून 4567.4 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा गेल्या वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील महसूल 4689.3 कोटी रुपये होता. EBITDA चा विचार केला असता त्यामध्ये 3.9 टक्क्यांची घसरण झाली असून तो 239.4 कोटी रुपयांवर आला आहे.


दुसऱ्या तिमाहीत काय स्थिती? 


2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा घटला होता. आरवीएनएलचा नफा 27.24 टक्क्यांनी घटून 286.88 कोटी राहिला होता. 2023-24 चा विचार केला असता दुसऱ्या तिमाहीत  हा नफा 394.26 कोटी रुपये होता. या दरम्यान कंपनीचा महसूल देखील 1.21 टक्क्यांनी घटून 4854.95 कोटी राहिला होता. 


इतर बातम्या :


LIC कडून स्मार्ट पेन्शन प्लॅन लाँच, एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर पेन्शन मिळवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती


PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये पाच दिवसांमध्ये खात्यात येणार, सर्वाधिक लाभार्थी शेतकरी कोणत्या राज्यात? महाराष्ट्र कितव्या स्थानावर?


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)