Retail Inflation Data For June 2023:  महागाई दरात सलग चार महिने घट दिसून आल्यानंतर सामान्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.  जून 2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात पुन्हा वाढ झाली आहे. जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.81 टक्के होता. तर मे 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.31 टक्के इतका नोंदवण्यात आला. 


खाद्यपदार्थ महागले


सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. जूनमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.49 टक्के झाला आहे. मे 2023 मध्ये 2.96 टक्के इतका होता. जून 2022 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 7.75 टक्के होता.


डाळी, भाजीपाला महागला


तूर डाळ आणि इतर डाळींच्या किंमतीत वाढ झाल्याने जून महिन्यात महागाई वाढली असल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये डाळींची महागाई 10.53 टक्के होती. तर मे महिन्यात ती 6.56 टक्के नोंदवण्यात आली. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर जूनमध्ये -0.93 टक्के होता, तर मे महिन्यात तो -8.18 टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर मागील महिन्यातील 17.90 टक्क्यांवरून 19.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या किमती मे महिन्यात 8.91 टक्क्यांच्या तुलनेत 8.56 टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर 12.71 टक्के राहिला आहे. मे महिन्यात हा महागाई दर 12.65 टक्के होता. 


तेल आणि फॅट्सचा महागाई दर -18.12 टक्क्यांवर आला. मे महिन्यात हा महागाई दर -16.01 टक्के होता. साखरेचा महागाई दर 3 टक्के नोंदवण्यात आला असून गेल्या महिन्यात 2.51 टक्के होता.


कर्ज स्वस्त होणार नाही?


जूनमध्ये किरकोळ महागाईचा आकडा 4.81 टक्के आहे. म्हणजेच आरबीआयचा महागाईचा टोलरेंस बँड दोन ते सहा टक्क्यांदरम्यान आहे.  मात्र यंदा देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिके आणि भाजीपाला उत्पादनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, एल निनोचादेखील धोका आहे. अशा स्थितीत महागाई वाढण्याचा धोका आहे. 


आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीच महागाईविरुद्धची लढाई संपली नसल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत, पुढील महिन्यात होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत कर्ज स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. 



मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर किती?


मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई दरामध्ये घसरण होत हा दर 4.25 टक्क्यांवर पोहचला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 4.70 टक्के इतका होता. सलग चौथ्या महिन्यात महागाईच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षात मे महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर हा 7.04 टक्के होता. तर खाद्य महागाई दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खाद्य महागाई दर हा तीन टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 2.91 टक्क्यावर पोहचला आहे. हा दर एप्रिल महिन्यामध्ये 3.84 टक्के इतका होता. तर मे 2022 मध्ये खाद्य महागाई दर हा 7.97 टक्के इतका होता.