Repo Rate and EMI : रिझर्व्ह बँकेने अचानकपणे रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता कर्ज व्याज दरात वाढ झाली आहे. रेपो दर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ केली असून नवीन दर लागू केले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.75 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर मोठ्या प्रमाणावर होणार असून गृह कर्ज महागणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम बँकेच्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेल्या गृहकर्जांसारख्या किरकोळ कर्जांवर होतो. बहुतेक बँकांनी त्यांचे कर्ज दर आरबीआय रेपो दराशी जोडले (RLLR)आहेत आणि त्यामुळे कर्जदारांना त्याचा तात्काळ परिणाम जाणवतो.
रेपो दराने कसे बिघडवले कर्जाचे गणित?
रेपो दरवाढीमुळे सामान्यांच्या कर्जाचे हप्ते वाढले आहेत. साधारणपणे 15 वर्षांसाठी घेतलेल्या गृहकर्जावर 0.4 टक्के रेपो दर वाढल्याने गृहकर्जाच्या हप्त्यात 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उदाहरण म्हणून 35 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी गृहीत धरल्यास, रेपो दरात 0.4 टक्क्यांनी वाढ झाल्याने व्याजाचा बोजा दरवर्षी 6.7 टक्के इतका होतो. (जवळपास 1.42 लाख रुपये )
तुम्ही जर 35 लाखांसाठी 7.1 टक्के दराने गृहकर्ज घेतले असल्यास दरमहा 31,655 रुपये ईएमआय देता. या कर्जाच्या रक्कमेसाठी तुम्ही 21,97,898 रुपये व्याज देता.
जर, व्याज दरात 0.4 टक्क्यांनी वाढ झाल्यास 7.5 टक्के व्याज दर होईल. त्यावेळी 35 लाखांसाठी तुमचा दरमहा ईएमआय 32,445 रुपये होईल. तर, तुम्हाला कर्ज घेतलेल्या रक्कमेसाठी 23,40,178 रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.
रेपो दरात आणखी वाढ झाल्यास, ईएमआय अधिक वाढेल. गृहकर्जाच्या व्याजदरात 0.5 टक्के आणि 1 टक्के वाढ झाल्यास, ईएमआय अनुक्रमे 3.1 टक्के आणि 6.2 टक्क्यांनी वाढतो.
सर्वसाधारणपणे, बँकांकडून ईएमआय स्थिर ठेवला जातो. त परंतु कर्जाचा कालावधी वाढवला जातो. बहुतेक RLLR कर्जदारांसाठी, RBI रेपो दर वाढीचा अर्थ कर्जाच्या कालावधीत वाढ असा आहे. रेपो दर वाढीचा व्याज दरावर परिणाम होतो. त्यामुळे रेपो दर वाढल्यानंतर तुमचा ईएमआय स्थिर असला तरी त्याच्या हप्त्यांच्या कालावधीमध्ये वाढ होते. थोडक्यात तुम्ही व्याजाची अधिक रक्कम बँकेला देता.
MCLR कर्ज घेणाऱ्यांवर काय परिणाम?
MCLR लिंक्ड कर्ज घेतलेल्यांवर रेपो दर वाढीचा तात्काळ परिणाम जाणवत नाही. MCLR लिंक्ड कर्जामध्ये व्याजाचा कालावधी निश्चित असतो. यामध्ये 12 महिने अथवा सहा महिन्यानंतर MCLR मध्ये बँकांकडून बदल केला जातो.
गृहकर्जाच्या व्याज दरात चढ-उतार होत असतो. त्यामुळे कर्ज, व्याज दराच्या बोझ्यापासून सुटका हवी असल्यास, तुमच्याकडे पैशांची अधिक बचत होत राहिल्यास मूळ कर्जाची रक्कम फेडण्याचा प्रयत्न करावा, असे तज्ज्ञ सुचवतात.