कोविड19 आणि त्यानंतर आलेला लॉकडाउन याचा फटका अर्थजगतला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब समजल्या जाणार्या शेअर बाजारावरही याचा मोठा परिणाम झाला. विक्रीचा सपाटा लावल्याने 24 मार्च रोजी शेअर बाजारात Lower Circuit लावून व्यवहार काही काळ बंद करावा लागला होता. पण त्यानंतर काहीच महिन्यांत शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली आणि वर्ष संपेपर्यंत बाजाराने आधीचा उच्चांक मोडत नवीन शिखरही गाठलं आहे. बाजारच्या या तेजीत IPO अर्थात Initial Public Offering च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात भांडवल उभं केलं गेलं.
कोविडनंतर शेअर बाजारात नवनवीन IPO येत राहिले. बाजारात आलेल्या तेजीचा फायदा मिळवता यावा हाच त्यामागील उद्देश होता. यामध्ये Happiest Mind, Route Mobile, Chemcon Specialty Chemical, CAMS, Gland Pharma यासारख्या IPO ने पाहिल्याच दिवशी तगडा नफा मिळवून दिला. या सर्वांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो Burger King या कंपनीचा IPO. सामान्य माणूस जिभेचे चोचले पुरविण्यासाठी बर्गर खाण्यासाठी “बर्गर किंग” मध्ये जातो तीच ही कंपनी. भारतीय अर्थव्यवस्था Consumption Story वर आधारित आहे असं म्हंटलं जातं. म्हणजे सामान्य माणसाची खर्च करण्याची आणि अर्थातच वस्तू विकत घेण्याची क्षमता. उंच जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करणार्या आणि सुरूवातीला मेट्रो सिटी किंवा मोठ्या शहरापुरता मर्यादित असणार्या या कंपन्या हळूहळू निम्नशहरी भागातही आपली पाळेमुळे खोलवर रुजवत आहेत. तेथेही यांचा चांगला व्यवसाय होताना दिसून येतो आणि त्याचंच प्रतिबिंब शेअर्समध्ये उमटताना दिसून येईल. यापूर्वीचं उदाहरण पाहिलं तर 2010 साली केवळ 145 रुपयांना असलेल्या Jubilant Food अर्थात Dominoz Pizza बनवणारी कंपनीचा शेअर आज 2500 रुपयांना आहे. याचीच आठवण करून देणारं चित्र आज Burger King च्या IPO च्या माध्यमातून दिसून आलं.
आयपीओ म्हणजे काय.?
कुठल्याही कंपनीला जर भांडवल उभं करायचं असेल किंवा कर्ज कमी करायचं असेल तर ती कंपनी आयपीओ या प्रक्रियेचा अवलंब करते. ज्या कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात नसतात ते आयपीओ या प्रक्रियेद्वारे लिस्ट केले जातात. आयपीओ आणण्यासाठी SEBI ची परवानगी घेणे आवश्यक असतं. त्यानंतर आयपीओ प्रक्रिया सुरू होते. SEBI कडून परवानगी मिळाल्यानंतर कंपनी IPO ची सर्व माहिती देते. त्यात सामान्य गुंतवणूकदारांसाठी किती शेअर्स, संस्थात्मक व गैर-संस्थात्मक मोठे गुंतवणूकदार यांसाठी किती कोटा असेल याची निश्चित माहिती असते. एक शेअर किती रुपयाला दिला जात आहे आणि किमान/कमाल किती शेअर्ससाठी Apply करता येईल याची माहिती मिळते. त्यानंतर IPO ला Apply करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ दिला जातो. त्यादरम्यान आयपीओसाठी अर्ज केला जातो. सर्वांना तो आयपीओ मिळेलच असे नाही. कारण कंपनीने एकूण किती शेअर्स आणले आहेत आणि मागणी करणारे किती आहेत यावर ते अवलंबून असतं. आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर एका पारदर्शक प्रक्रियेद्वारे शेअर्सचं Allotment होतं, अर्थात ज्यांना शेअर्स मिळाले ती यादी समोर येते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत तो आयपीओ लिस्ट केला जातो म्हणजे आपल्या रोजच्या शेअर बाजारात त्याची देवाण-घेवाण प्रक्रिया करता यावी. ज्या किमतीला शेअर दिला आहे त्याच किमतीला तो शेअर लिस्ट होईल असं नाही. तो कमी किंवा जास्त किमतीला लिस्ट होऊ शकतो. हे सर्व गणित मागणी-पुरवठा (Buyers-Sellers) वर अवलंबून असतं. लिस्ट झाल्यानंतर त्यात कोणताही गुंतवणूकदार ट्रेड करू शकतो.
बर्गर किंगचा थाट!
बर्गर किंग या कंपनीने आयपीओ आणायचं ठरवलं आणि त्यासाठी 2 ते 4 डिसेंबर (Issue Date) ही Apply करण्याची तारीख ठरवली. एका शेअरची किंमत 60 रुपये (याला Price Band अथवा Issue Price म्हणतात) इतकी ठरवली आणि किमान 250 शेअर्स घेण्याची अट होती (याला Lot Size म्हणतात. म्हणजे एका लॉटमध्ये 250 शेअर्स.) गुंतवणूकदारांना या पटीत Apply करण्याचे बंधन असते. कंपनीचा बिझनेस, ब्रॅंड आणि या क्षेत्रात होणारी ग्रोथ लक्षात घेता बाजार तज्ञांनी या आयपीओसाठी Apply करावं असा सल्ला दिला. या आयपीओ ला Retail Investor, Institutional Investor आणि Non-Institutional Investors यांनी जोरदार प्रतिसाद दिला. हा आयपीओ 156 पटीने अधिक Subscribe झाला. म्हणजे कंपनी जितके शेअर्स आणत होती त्यापेक्षा शेअर घेण्यासाठी उत्सुक असणार्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. त्यानंतर आज म्हणजे 14 डिसेंबरला हा शेअर भांडवली बाजारात NSE आणि BSE या Exchanges वर लिस्ट झाला. लिस्ट होतानाच या शेअरची किंमत 115 रुपये इतकी होती. म्हणजे कंपनीने 60 रुपयांना आयपीओ च्या माध्यमातून दिलेला शेअर बाजारात 115 रुपये इतक्या मोठ्या किमतीत मिळाला. यालाच 90% अधिक प्रीमियमवर लिस्ट झाला असं म्हणतात. ज्या गुंतवणूकदाराला एक लॉट मिळाला त्याच्या एकूण 15000 (25060) गुंतवणुकीचं मूल्य 250115= 28750 इतकं झालं. आजच्या दिवसात या शेअरने BSE वर 108.40 चा Low आणि 138.40 चा High बनवला.
Hold की sell..?
शेअर बाजारात असणार्या तेजीचा फायदा तर या शेअरला भेटलाच शिवाय हे क्षेत्र भविष्यात लाभकारी ठरू शकतं आणि यात वाढ होऊ शकते या अपेक्षेने या शेअरमध्ये पुन्हा नव्याने खरेदी पाहायला मिळाली. याच क्षेत्रातील इतर शेअर्स महाग आहेत आणि तुलनेने हा शेअर स्वस्त मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा याकडे ओढा दिसून आला. एकंदरीत Subscription आणि Listing Gain च्या बाबत्तीत यावर्षीच्या टॉप 5 आयपीओ पैकी हा एक!
आत्तापर्यंतचा इतिहास पाहता अनेक IPO त्यांच्या Issue Price च्या किमतीपेक्षा कमी गेलेले आहेत. यावर्षीचं उदाहरण घेतलं तर SBI Card हा दर्जेदार शेअर Issue Price 755 पेक्षा कमी लिस्ट झाला आणि कोविड19 च्या पडझडीत 500₹ पर्यंत गेला होता. Chemcon Speciality हा शेअर लिस्ट खूप चांगला झाला पण त्याच दिवशी कोसळला सुद्धा. Burger King कंपनीने IPO आणला होता तो मुळात कंपनीवरील कर्ज कमी करून शृंखला विस्तार करण्यासाठी. ज्यांना IPO मिळाला आहे त्यांनी मूळ रक्कम परत येईल इतके शेअर्स विक्री करून बाकीचे दीर्घकाळ गुंतवणूक म्हणून होल्ड करावेत तर ज्यांना ते शेअर्स मिळाले नाहीत त्यांनी हळूहळू SIP पध्दतीने बाजाराच्या पडझडीत यामध्ये गुंतवणूक करावी!