Reliance Industries:  देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) एप्रिल ते जून या आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे (Quarter 1 result) निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 11 टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत रिलायन्सचा नफा (Reliance Profit) 16,011 कोटी रुपये आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा 17,955 कोटी रुपये होता.


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऑपरेशनमधून मिळणारे उत्पन्न देखील 5.3 टक्क्यांनी घसरले आहे. यंदाच्या वर्षातील तिमाहीत 2.11 लाख कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत 2,23,113 कोटी रुपये इतके उत्पन्न होते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश (Reliance Dividend) जाहीर केला आहे.


तेल आणि केमिकल व्यवसायामध्ये कमकुवत कामगिरी केल्याने रिलायन्सच्या महसुलात घट झाली आहे. या क्षेत्रातील व्यवसायातील महसुलात 18 टक्के घट झाली आहे. किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायाच्या चांगल्या कामगिरीमुळे महसूल आणि नफ्यात मोठी घट टळली आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायाचा महसूल 20 टक्क्यांनी वाढून 69,962 कोटी रुपये आणि नफा 2448 कोटी रुपये झाला आहे. तर डिजिटल सेवांचा महसूल 13 टक्क्यांच्या वाढीसह 32,077 कोटी रुपये झाला आहे. 


तिमाही निकालानंतर  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, या तिमाहीत रिलायन्सची मजबूत ऑपरेटिंग आणि आर्थिक कामगिरी औद्योगिक आणि ग्राहक विभागांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या विविध व्यवसायांच्या आमच्या पोर्टफोलिओची लवचिकता दर्शवते. 


रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश एम अंबानी यांनी डिजिटल व्यवसायाच्या कामगिरीबद्दल सांगितले की, जिओ वेगाने त्यांचे 5G नेटवर्क आणत आहे. Jio डिसेंबर 2023 पूर्वी संपूर्ण भारतातील 5G ​​रोलआउट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 2G मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी Jio ने JioBharat फोन लॉन्च केला आहे. या नवीन गुंतवणुकीसह, जिओ पुढील काही वर्षांत कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढीचा वेग वाढेल असेही त्यांनी म्हटले. 


रिलायन्स रिटेलच्या निकालांवर बोलताना, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी सांगितले की, या तिमाहीत आमची आर्थिक कामगिरी मजबूत होती आणि ती आमच्या व्यावसायिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे. आमची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. आमच्या ग्राहकांसाठी खरेदी अधिक आकर्षक बनवण्यासाठी आम्ही आमच्या स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये नवनवीन शोध आणि गुंतवणूक करत राहू असेही ईशा अंबानी यांनी म्हटले. 


'जिओ फिन'वर मुकेश अंबानी यांचे भाष्य


जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डिमर्जरवर मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची डिमर्जर प्रक्रिया मोठ्या मंजुरीसह मार्गावर आहे. ते म्हणाले की मला विश्वास आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस भारतात आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: