Virat Kohli Century: विराट कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले. विराट कोहलीचे हे कसोटीमधील 29 वे शतक आहे. वनडे, टी २० आणि कसोटी असे एकूण ७६ वे कसोटी शतक झळकावले आहे.


दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत शतक झळकावले. १८० चेंडूमध्ये दहा चौकारांच्या मदतीने विराट कोहलीने शतक ठोकले. अजिंक्य रहाणे झटपट तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने जाडेजाच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांच्यापुढे वेस्ट इंडिजची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. विराट आणि जाडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला.


 विराट कोहलीने शतक झळकावत खास विक्रम केला आहे. विदेशात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सचिन तेंडुलकरपेक्षा फक्त एक शतक मागे राहिला आहे. विराट कोहलीने विदेशात 28 शतके ठोकले आहेत. सचिन तेंडुकरने विदेशात 29 शतके ठोकले आहेत. 






त्याशिवाय वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक शतके लगावण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकले आहे. याबाबत गावसकरांच्या एक शतक मागे आहे. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरोधात १३ शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरोधात १२ शतके लगावली आहेत. जॅक कॅलिसनेही विडिंजविरोधात १२ शतके झळकावली आहेत. एबी डिव्हिलिअर्स याने ११ शतकांना ठोकली आहेत.






दरम्यान, भारताने पहिल्या डावात चार विकेटच्या मोबदल्यात ३३६ धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानावर आहेत. पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी झाली आहे.