लातूर: मागील तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाची नोंद आहे, त्यामुळे तीन दिवसापासून सूर्यदर्शन झालेच नाही. जिल्ह्यात ढगाळ वातावरण जरी असलं आणि रिमझिम पाऊस जरी पडत असला तरीही मोठा पाऊस अद्याप झाला नव्हता. मात्र काल रात्री आणि आज सकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केलेली पहायला मिळत आहे. लातूर शहर आणि परिसर निलंगा, औराद, शहाजानी, लामजना आणि जळकोट या भागामध्ये रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती.


जळकोट तालुक्यात पावसाचा जोर.. आतनुर भागात रस्ता बंद


गुरुवारी रात्री जळकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आतनुरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मरसांगवी जवळच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे मरसांगवी डोंगरगाव या गावाबरोबरच अनेक वाडी-तांड्यांचा संपर्क तुटला आहे. आतनूर हे ह्या भागातील मोठे गाव आहे. येथे बाजारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा महाविद्यालय आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना आता दुसरा कुठलाच रस्ता नाही.


पाझर तलाव फुटला, दोन जनावरांचा मृत्यू


आतनुर शिवारात रात्री तुफान पाऊस झाला मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर याशिवारात असलेल्या एका छोट्या पाझर तलावात पाणी ओव्हर फोलो झाले होते. यामुळे हा पाझर तलाव फुटला आणि पाणी वाहून गेले. पाझर तलाव फुटल्या कारणाने आजूबाजूला असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झालं. जमीन खरडून गेली. मारुती सोमवंशी या शेतकऱ्याची दोन जनावरे या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली आहेत. या पाण्यामुळे नुकतच पेरणी केलेल्या शेताला मोठा फटका बसला आहे.


जळकोट तालुक्यातील दोन्ही महसूल मंडळात आज अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस झाला आहे. जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. घोणसी महसूल मंडळातील रावणकोळ मरसांगवी आणि अतनूर भागात नुकसानाचे प्रमाण अधिक आहे. येथील पाझर तलाव फुटून दोन म्हशींचा ही मृत्यू झाला आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे अशी माहिती जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी दिली आहे. 


जिल्ह्याभरात पाऊस कमी अधिक प्रमाणात


लातूर जिल्ह्यातील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. दिवसभरात अनेक वेळेस हलक्या सरी पडून जात आहेत. रेनापूर, औसा, उदगीर सारख्या भागामध्ये पावसानं अद्याप जोर धरला नाही. मात्र या भागात ढगाळ वातावरण असून दररोज हलक्या सरी पडून जात आहेत. जळकोट निलंगा औराद शहाजानी लातूर शहर आणि परिसर सारख्या भागात काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पावसाच्या जोरदार सरीवर बरसून गेल्या. जळकोट सारख्या भागात तर पावसामुळे नदी नाल्यात पुढे दुथडी भरून वाहत होते. जिल्ह्याभरात पाऊस आहे मात्र त्यामध्ये प्रचंड असमतोल पहावयास मिळत आहे. 


ही बातमी वाचा: