Reliance Industries Q3 Result मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे आर्थिक वर्ष 2024 -25 च्या तिसऱ्या तिमाहीमधील म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीच्या कामगिरीचे रिपोर्टस जाहीर झाले. रिलायन्स या काळात 18540 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. आर्थिक संस्थांचे अंदाज चुकवत रिलायन्सनं नफ्यात 7 टक्क्यांची वाढ केली आहे. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 17265 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर होताच रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
रिलायन्सचा महसूल 2.40 लाख कोटींवर
2024-25 या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल 2.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 2.25 लाख कोटींवर होता. म्हणजेच यामध्ये देखील 6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एबिटामध्ये देखील 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत तो 43789 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्सचा एबिटा 40646 कोटी रुपये होता. रिलायन्सच्या एबिटा मार्जिनमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
रिलायन्स जिओची जोरदार कमाई
रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत 6477 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत निव्वळ नफ्याची रक्कम 5208 कोटी रुपये होती. ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये कंपनीचा महसूल 29307 कोटी रुपये होता. रिलायन्स जिओच्या एबिटामध्ये देखील तिसऱ्या तिमाहिती वाढ पाहायला मिळाली. ती रक्कम 15478 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
रिलायन्सच्या कामगिरीवर मुकेश अंबानी काय म्हणाले?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ऑईल टू केमिकल बिझनेसमध्ये चांगली प्रगती दिसत आहे. जामनगरच्या रिफायनरीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनीचं रिफायनिंग मार्जिन देखील चांगल्या प्रकारे वाढत आहे. कंपनी आपल्या विकासाच्या मार्गावर वेगानं पुढं जात आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या निकालामुळं टेलिकॉम बिझनेसमध्ये कंपनीचा चांगला विकास पाहायला मिळत आहे. रिलायन्स रिटेलमध्ये देखील चांगली वाढ पाहायला मिळत आहे. रिलायन्स उद्योग समूह आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देतोय, असं मुकेश अंबानी म्हणाले.
रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तिमाहीचे आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तेजी पाहायला मिळाली. रिलायन्स जिओच्या फायनान्शिअल सर्विसेसच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली.
इतर बातम्या :