Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीजची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी सभेला संबोधित करत आहेत. या एजीएम दरम्यान, शेअर बाजारात रिलायन्सचे शेअर्सही वाढीसह व्यवहार करत आहेत. 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या संदेशाचा संदर्भ देऊन मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये आपल्या भाषणाची सुरुवात केली. भारत खचून जात नाही, थांबत नाही आणि हरत नाही, असं मुकेश अंबानी AGM मध्ये बोलताना म्हणाले. यासोबतच त्यांनी चांद्रयान-3 च्या यशाबद्दलही मुकेश अंबानी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.  


नवं रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी वचनबद्ध 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत मुकेश अंबानी म्हणाले की, "नवा भारत थांबत नाही, खचून जात नाही आणि हरत नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या ग्रह, पृथ्वी, देश आणि कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांची काळजी घेते. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास वचनबद्ध आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, देश वेगानं आर्थिक प्रगती करत आहे. सन 2047 पर्यंत भारत एक पूर्ण विकसित देश होईल अशी अपेक्षा आहे.


जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य


आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीचे जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे.


डिसेंबरपर्यंत देशभरात 5G रोलआऊट होणार 


Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.


बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये आकाश अंबानी, ईशा अंबानी, अनंत अंबानी यांचा समावेश 


आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये ही घोषणा केली. 


अंबानी कुटुंबातील नव्या पिढीकडे कमान सोपवण्याची घोषणा


बोर्डातील फेरबदलाबाबत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, बोर्डाच्या बैठकीत ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मी अभिमानानं सांगू शकतो की, त्यांनी हे यश समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमानं मिळवलं आहे. इतर संचालकांसह, ते रिलायन्स समुहाला नेतृत्व देण्यासाठी आणि आमच्या सर्व व्यवसायांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संघ म्हणून काम करतील. दुसरीकडे नीता अंबानी यांनी रिलायन्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील आणि या भूमिकेत त्या बोर्डाच्या कायम निमंत्रित म्हणून बोर्डाच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतील.


दरम्यान,  रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यामध्ये मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. रिलायन्सच्या AGM ची घोषणा झाल्यापासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं होतं. मुकेश अंबानींच्या घोषणांकडे गुंतवणूकदार डोळे लावून बसले होते.