RBI Hike Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना सणासुदीच्या काळात ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय, नवीन कर्जेदेखील महाग झाली आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. वर्ष 2023 मध्ये विकास दर हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. याआधी आरबीआयकडून विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


मागील पाच महिन्यात व्याज दरात 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी व्याज दर 5.40 टक्के इतका होता. आता, व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे. 


आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पुढे म्हटले की, मागील अडीच वर्षात जगाला कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धाला सामोरे जावे लागले. जागतिक पातळीवर सातत्याने आव्हानात्मक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने त्याचा धैर्याने सामना केला. देशातील ग्रामीण भागात मागणी वाढली असून गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर 6 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.


महागाई नियंत्रणात येणार?


महागाईबाबत बोलताना गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, महागाईचा दर अजूनही अधिक आहे. देशात आयात होणाऱ्या वस्तूंच्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यामागे डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण हे कारण असल्याचे ही त्यांनी सांगितले. भारतात आगामी काळात महागाईच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था अधिक चांगली असल्याचे त्यांनी म्हटले.


>> रेपो रेट म्हणजे काय?


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 


>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो.