RBI Action News fines : नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सातत्यानं कारवाई करत आहे. तसेच अशा बँकांना मोठा दंड ठोठावत आहे. अनेक बँकांवर, संस्थावर आरबीआयने कारवाई केलीय. अशातच आता आरबीआयने एचएसबीसी या बँकेला (HSBC Bank) 36.38 लाखांचा दंड ठोठावला आहे. नेमका आरबीआयने का दंड ठोठावला आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.


रिझर्व्ह बँकेने एचएसबीसीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याबद्दल एचएसबीसीला 36.38 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचएसबीसीने FEMA कायदा, 1999 च्या उदारीकृत रेमिटन्स स्कीम अंतर्गत आवश्यक माहिती प्रदान करण्याच्या तरतुदीचे पालन केले नाही, म्हणून कारवाई केल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एचएसबीसीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटिशीला लेखी उत्तर देण्याबरोबरच बँकेने तोंडी बाजूही मांडली होती.


रिझर्व्ह बँकेने दिेलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित तथ्ये आणि बँकेकडून मिळालेल्या उत्तराचा विचार केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या निष्कर्षाप्रत आली की, नियमांचे उल्लंघन झाल्याची खात्री झाली आहे आणि दंड आकारणे योग्य आहे. RBI ने Hero Fincorp Ltd वर उचित व्यवहार संहितेशी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 3.1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. Hero Fincorp ने कर्जदारांना त्यांना समजलेल्या स्थानिक भाषेत कर्जाच्या अटी व शर्तींची लेखी माहिती दिली नाही.


2024 या आर्थिक वर्षात RBI ने ठोठावला 64 बँकांना दंड


रिझर्व्ह बँकेने 2024 आर्थिक वर्षात 64 बँका आणि NBFC वर 74.1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. तर, आर्थिक वर्ष 2023 मध्ये 41 बँकांना एकूण 33.1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. डेटामध्ये सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा समावेश नाही. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये लावण्यात आलेल्या दंडांपैकी, 16 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 13 खासगी बँका, चार परदेशी बँका आणि एक लघु वित्त बँक आणि पेमेंट बँकेसह बँकांवर 35 नियामक कारवाई करण्यात आल्या. 1 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.


नुकतीच RBI ने एस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर केली होती कारवाई


दरम्यान, नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई केली होती. आरबीआयनं येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेला नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. दोन्ही बँका दोषी आढळल्यानं आरबीआयनं मोठा आर्थिक दंड ठोठावला होता. आरबीआयनं येस बँकेला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड केला होता. या घटनेनंतर लगेच बँकेलं HSBC बँकेला दंड ठोठावला आहे.   


महत्वाच्या बातम्या:


RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण...