डोंबिवली : ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने घेऊन पसार होणाऱ्या भामट्या नणंद भावजयीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक (Jewelery Robber Women Arrested By Dombivli Police) केली आहे. विशेष म्हणजे या दोघीही औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. ठाण्यातील खारेगाव परिसरात झोपडी बांधून त्या राहत होत्या. या दोघींवर राज्यभरात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात विनायक ज्वेलर्स (Vinayak Jewelery Dombivli) दुकान आहे. काही दिवसांपूर्वी या दुकानात दोन अनोळखी महिला आल्या होत्या. दुकानाचे मालक आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून या महिलांनी हातचलाखीने दुकानांमधील दागिने चोरले. काही क्षणात या दोन्ही महिला दुकानातून निघून गेल्या.
त्यानंतर काही वेळाने दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली आणि त्याने आजूबाजूला शोध घेतला. मात्र तोपर्यंत या महिला पसार झाल्या होत्या. दुकान मालकाने याबाबत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बलवंत भरडे, सचिन भालेराव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला ताब्यात
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलांची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांचा शोध सुरू केला आणि त्यांना अटक केली. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन्ही महिलांचे नाव असून या दोघी नणंद आणि भावजयी आहेत.
अटक करण्यात आलेल्या या दोघी नणंद- भावजयी मूळच्या औरंगाबादच्या असून खारेगाव परिसरात मैदानालगत झोपडी बांधून तिकडेच राहत होत्या. या दोघी ज्वेलर्सचे दुकाने फिरून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने घेऊन पसार व्हायच्या. त्यांचं राहणीमान बघून कोणालाही संशय येत नव्हता. डोंबिवली मधील ज्वेलर्समध्ये चोरी करताना त्या सीसीटीव्ही कॅमेरात आल्या आणि या दोन्ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
या दोन्ही महिलांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. या दोघींवर अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
ही बातमी वाचा: