RBI rbi monetary policy : कर्जदारांची आज पुन्हा निराशा होण्याची शक्यता आहे.. कारण रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कर्जावरचे व्याजदर पुन्हा वाढवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील.  रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान असणार आहे.


भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक 3 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC meeting) बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे.  रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील. 
 
व्याज दर वाढण्याची शक्यता का?


एका अहवालानुसार, देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वर्षात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने  व्याज दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्या तुलनेत भारतात आरबीआयने व्याज दरात फारशी वाढ केली नाही. त्यामुळे आरबीआय आणखी व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते. 


याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला.  त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यानंतर आता 5 ऑगस्ट रोजी आरबीआय रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. 




 



रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.