मुंबई : भारतात अनेक लोक असे असतात ज्यांची अनेक बँकांमध्ये खाती असतात. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली की ज्यांच्याकडे दोन खाती असतील त्यांना आरबीआयच्या नव्या नियमामुळं दंड भरावा लागेल. मात्र, आरबीआयनं असा कोणताही निर्णय घेतला नसून दोन किंवा त्यापेक्षा अधिक बँक खाती असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार ाही.
आरबीआयचं नाव घेत काही पोस्ट व्हायरल करण्यात आल्यानं ज्यांच्याकडे एक पेक्षा अधिक खाती आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एक पेक्षा अधिक बँख खाती असतात. कारण खासगी क्षेत्रातील कर्मचारी जेव्हा एका कंपनीतील नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जातात तिथं दुसरी कंपनी त्यांच्या नियमानुसार नवं बँक खाते उघडते. त्यामुळं काही कर्मचाऱ्यांची 4 ते 5 बँकेत खाती उघडली जातात. आरबीआयच्या नावानं केल्या जाणाऱ्या दाव्याचं सत्य नेमकं काय हे जाणून घेणं आवश्यक आहे.
दावा नेमका काय?
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात येतोय की तुमच्याकडे एक पेक्षा अधिक बँक खाती असतील तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्या दाव्यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा संदर्भत आरबीआयनं नव्या गाईडलाईन्स जारी केल्याचं सांगण्यात येतं. त्यानुसार ज्या व्यक्तींकडे दोन किंवा अधिक बँक खाती असतील त्यांना दंड भरावा लागेल, असा दावा करण्यात आला.
नेमकं सत्य काय?
पीआयबीनं या दाव्याचं फॅक्ट चेक असून त्यांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त बँक खाती असल्यास दंड भरावा लागणार हा दावा फेक असल्याचं स्पष्ट केलं. आरबीआयनं याबाबत कोणतंही पत्रक किंवा मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत.त्यामुळं दोन किंवा त्यापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड भरावा लागू शकतो असा दावा खोटा असल्याचं स्पष्ट होतं.
भारतात एक व्यक्ती किती बँक खाती काढू शकतो?
भारतात एक व्यक्ती किती बँक खाती काढू शकतो याबाबत कोणताही नियम नाही. भारतात एखादा व्यक्ती किती बँक खाती काढू शकतो याबाबत कोणत्याही मर्यदा नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार बँक खाती काढू शकता. आरबीआयनं देखील कोणत्या प्रकारची मर्यादा घातलेली नाही. मात्र, तुम्ही जितकी बँक खाती काढता त्या खात्यांमध्ये प्रत्येक बँकेच्या नियमानुसार किमान रक्कम ठेवावी लागते.
इतर बातम्या :
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर