RBI Meeting : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा (RBI Monetary Policy Meeting) बैठकीतील निर्णय आज जाहीर होणार आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das)  आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर करतील. आरबीआयकडून आज रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. व्याज दरात वाढ झाल्यास कर्जेदेखील महाग होणार आहे.


अमेरिकेसह इतर देशातील बँकांनीदेखील व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे आरबीआयदेखील व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात पडझड सुरू आहे. आरबीआयच्या निर्णयाला बाजार कसा प्रतिसाद देतोय, याकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. 


आज आरबीआयने व्याज दरात वाढ केल्यास सलग चौथ्यांदा ही दरवाढ असणार आहे. आरबीआयने मे महिन्यापासून व्याज दरात वाढ केली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरुन 5.40 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे EMI मध्ये वाढ झाली आहे.


महागाईचा दर  6 टक्क्यांखाली आणण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महागाई अजूनही नियंत्रणात नाही. तर, दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण होत आहे. यामुळेही महागाई वाढण्याचा भीती आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआयची बैठक महत्त्वाची आहे.  


>> रेपो रेट म्हणजे काय?


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 


>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: