RBI MPC Meeting:  सर्वसामान्य कर्जदारांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. होम लोन, कार लोन अशा विविध कर्जांचा हप्ता वाढणार की स्थिर राहणार अथवा त्यात घट होणार, याबाबत उद्या मोठी घोषणा होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून उद्या पतधोरण जाहीर केले जाणार आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास हे उद्या व्याज दराची घोषणा करतील. मागील दोन दिवसांपासून आरबीआयची पतधोरण आढावा बैठक सुरू असून उद्या 8 जून रोजी बैठक संपणार आहे. आरबीआयच्या या बैठकीतील निर्णयाचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होतो. महाग झालेले कर्ज आणि ईएमआयच्या वाढत्या बोझ्यातून सामान्यांना दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


मागील काही महिन्यात किरकोळ महागाईचा दर घटला आहे. महागाई नियंत्रणात आल्याने आरबीआयकडून रेपो दर कमी केला जाऊ शकतो अथवा स्थिर ठेवला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महागाईचा दर हा आरबीआयने निश्चित केलेल्या 6 टक्के दराच्या मर्यादेच्या आसपास आहे. त्यामुळे आरबीआय दिलासा देण्याचा निर्णय घेऊ शकते. 


रेपो दर स्थिर राहण्याचा अंदाज का? 


गेल्या काही महिन्यात महागाईचा दर लक्षणीयरित्या नियंत्रणात आला आहे. आरबीआयचे पतधोरण ठरवणारी 6 सदस्यीय समिती रेपो दर 6.50 टक्क्यांपर्यंत ठेवू शकतो. नव्या वर्षातील पहिल्या बैठकीतही आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर एप्रिलच्या बैठकीत आरबीआयने  व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही.


किरकोळ महागाई दरात घट


किरकोळ महागाई दरात (ग्राहक किंमत निर्देशांक) घट झाली आहे. एप्रिलमध्ये, नवीन आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या महिन्यात, किरकोळ चलनवाढीचा दर 4.70 टक्क्यांवर आला आहे. मार्च 2023 मध्ये हा दर 5.66 टक्के होता. हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा महागाई दर खाली आला असून तो 18 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या दरम्यान खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी झाला आहे. मार्च 2023 मध्ये अन्नधान्य महागाई 4.79 टक्क्यांवरून 4 टक्क्यांच्या खाली 3.84 टक्क्यांवर आली आहे. एक वर्षापूर्वी, एप्रिल 2022 मध्ये, किरकोळ महागाई 7.79 टक्के आणि अन्नधान्य महागाई 8.31 टक्के या सर्वोच्च पातळीवर होती.


रेपो रेट आणि EMI चा संबंध काय? 


 रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होतं आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचं कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन  (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.


रेपो रेट (Repo Rate) म्हणजे, ज्या दरावर रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे, ज्यावर रिझर्व्ह बँक पैशांच्या ठेवींवर व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्ज महाग होतात आणि या क्रमानं ईएमआयमध्येही वाढ होते.