Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कर्जदारांना दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल केला नसून रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. तसेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा आरबीआयच्या पतधोरण समितीने निर्णय घेतला आहे. मागील वर्षात 2.50 टक्क्यांनी आरबीआयनं वाढ करत रेपो रेटमध्ये बदल केले होतेय चालू आर्थिक वर्षात विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.
महागाईत भर पडण्याची शक्यता
एप्रिल महिन्यातील महागाई दर 4.7 टक्के जो मागील वर्षातला सर्वात कमी आहे. भारतीय हवामान विभागाकडून मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगाम कसा असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मान्सूनची अनिश्चितता, साखर, तांदूळ आणि क्रूड तेलाच्या किंमती यामुळे महागाईत भर पडण्याची शक्यता आहे.
महागाई दर 2023-24 मध्ये 5.1 टक्के राहण्याचा अंदाज
- पहिल्या तिमाहीत 4.6 टक्के
- दुसऱ्या तिमाहीत 5.2 टक्के
- तिसऱ्या तिमाहीत 5.4 टक्के
- चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के महागाई दर राहण्याचा अंदाज
रेपो रेट आणि EMI चा संबंध काय?
रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होतं आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचं कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.
रेपो रेट (Repo Rate) म्हणजे, ज्या दरावर रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे, ज्यावर रिझर्व्ह बँक पैशांच्या ठेवींवर व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्ज महाग होतात आणि या क्रमानं ईएमआयमध्येही वाढ होते.