Repo Rate Hiked:  वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी मॉनिटरिंग समितीने रेपो दरात 40 बीपीएसने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावरही दिसून आले. शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. 


आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत ही रेपो दरवाढीची माहिती दिली. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ करण्यात आली. रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. रेपो रेट वाढवल्याने कर्ज महागणार आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कर्जावरील व्याज दर वाढणार असल्याने ईएमआयमध्येदेखील वाढ होणार आहे. 


रिझर्व्ह बँकेची आढावा बैठक 6 ते 8 जून रोजी होणार आहे. मात्र, जागतिक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवला आहे. याआधी एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर स्थिर होते. 


शेअर बाजारात पडझड


रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला. तर, निफ्टी 330 अंकानी कोसळला. आज सकाळपासून शेअर बाजार अस्थिर होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा करताच शेअर बाजार कोसळला.  


रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.