मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा (TATA) कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan tata) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रतन टाटा यांना काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, खुद्द रतन टाटा यांनीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. आता, पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना अतिदक्षता विभागात (Hospital) दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.
रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपलुकी आहे. टाटा कंपनीच्या माध्यमातून त्यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं आहे. तर, देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रकृतीबद्दल सर्वसामान्य नागरिकांनाही काळजी वाटते. त्यातून, रतन टाटांच्या लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. आताही, सोशल मीडियातून गेट वेल सून म्हणत रतन टाटा यांच्या उत्तम प्रकृतीसाठी व लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी पत्रकाद्वारे प्रकृतीविषयक माहिती दिली होती. ''वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही,'' असं रतन टाटा यांनी सांगितलं होतं.
विख्यात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली चाचण्या
मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांना यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली चाचण्या केल्या जात आहेत. डॉ. शाहरुख हे एक विख्यात डॉक्टर आहेत. रतन टाटा यांना दोन दिवसांपूर्वीच रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात दाखल करण्यामागचं कारण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांचा रक्तदाब रात्री कमी झाला होता. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस