Ratan Tata Death: उद्योगपती व टाटासन्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं वयाच्या ८६व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. एक यशस्वी उद्योगपतीच नाही तर टाटा समुहाला नव्या उंचीवर नेत जगाभरात मोठे नाव कमवणारं हे व्यक्तिमत्व होते. पण तुम्हाला माहितीये का.. लाखो तरुणांना आपल्या कंपनीत नोकरी देणाऱ्या रतन टाटांनी स्वत: च्या कारकिर्दीची सुरुवात कर्मचारी म्हणून एका दुसऱ्या कंपनीत काम करण्यासाठी बायोडाटा तयार करावा लागला होता. रतन टाटांना यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी पहिली नोकरी टाटा ग्रूपमध्ये नाही तर दुसऱ्या कंपनीत केली होती. 


जेआरडी संतापले, रतन टाटांना खडसावले


ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा रतन टाटा अमेरिकेत अभ्यासासाठी गेले होते. तिथे त्यांनी कॉर्नर विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्यानंतर ते तिथेच स्थायिक होण्याचा विचार करत होते. पण दरम्यान त्यांच्या आजी लेडी नवजबाई यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना भारतात परत यावं लागलं. पण परतल्यानंतर रतन टाटांनी टाटा समुहातच पहिली नोकरी स्वीकारली नाही तर कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता ही नोकरी स्वीकारल्याने आयबीएममध्ये ते सामील झाले.  पण कधी ना कधी जीआरडींना ही बातमी कळणारच होती. ही बातमी कळताच जेआरडी भयंकर संतापले होते. त्यांनी रतन टाटांना चांगलंच खडसावलं. तुम्ही भारतात राहून आयबीएमसाठी काम करू शकत नाही असं म्हणत जे आर डी नी रतन टाटांना त्यांचा बायोडाटा शेअर करण्यास सांगितले. 


दुसऱ्या कंपनीच्या टाईपराईटरवर केला बायोडाटा


त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे त्यांचा बायोडाटा ही नव्हता त्यामुळे त्यांनी आयबीएम ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाईपराईटरवर टाईप करून त्यांचा बायोडाटा तयार केला. 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये त्यांना नोकरी मिळाली म्हणजे स्वतःच्याच कंपनीत. टाटा कुटुंबातील सदस्य असूनही नोकरी स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांना त्यांच्या कंपनीतील सर्व काम करावी लागली. कंपनीच्या कारभाराचा अनुभव घेत घेत ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचले. 1991 मध्ये टाटा सन्स आणि टाटा समुहाचे अध्यक्ष पद रतन टाटांनी स्वीकारले. 21 वर्ष टाटा समूहाचा नेतृत्व करत कंपनीला एका मोठ्या उंचीवर त्यांनी नेलं. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा 100 हून अधिक देशांमध्ये विस्तारही झाला. सर्वसामान्यांना परवडणारी नॅनो कार ही देखील रतन टाटांची संकल्पना होती.


हेही वाचा:


अनमोल 'रतन'! हिमालयाला हुंदका, साधेपणावर देश फिदा, भारतीय उद्योग जगताचा पितामह, रतन टाटांची कारकीर्द बघा, सलाम ठोकाल!