मुंबई: टाटा समूहाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे आणि भारतीय उद्योग जगताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि वैयक्तिक जीवनात मूल्याधिष्ठित विचारसरणीचे कसोशीने पालन केल्यामुळे रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या जिवंतपणीच दंतकथा झाले होते. त्यांची उद्योग क्षेत्रातील भरारी, कर्तृत्व यासोबतच साधे राहणीमान, उद्योगविश्वात केंद्रस्थानी असूनही इतरांशी अदबीने वागण्याची पद्धत यामुळे रतन टाटा हे कायमच चर्चेत असायचे. त्यामुळे रतन टाटांच्या जाण्याने समाजातील सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रतन टाटा यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आवर्जून सांगितले जातात. त्यांच्या निधनानंतर डॉ. प्रशांत भामरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रतन टाटा यांचे श्वानप्रेम (Dogs) सर्वश्रूत आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या एका श्वानाच्या उपचारासाठी डॉक्टर (veterinary doctor) त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते. त्यावेळी कुत्रा त्यांना चावला. यानंतर रतन टाटांनी नेमकं काय केलं, याचा वृत्तांत डॉ. भामरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कथन केला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
डॉ. प्रशांत भामरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपला सहकारी डॉक्टर वैभव पगार यांच्याबाबत घडलेला किस्सा सांगितला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वर्गीय श्री रतन टाटा यांच्याशी माझा प्रत्यक्ष कधीही संबंध आला नाही. तथापि त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आलेल्या एका व्यक्तीने माझ्यासोबत शेअर केलेला अनुभव अतिशय अभूतपूर्व आणि थक्क करणारा आहे.
माझे सहकारी व ज्युनिअर डॉक्टर वैभव पवार हे एकेकाळी प्रॅक्टिशनिंग व्हेटर्नरीयन होते. साधारणता 15 वर्षांपूर्वीचा काळ असेल. तेव्हा रतन टाटांच्या कुत्र्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी ते त्यांच्याकडे जात असत. एकदा त्यांना रतन टाटांकडून निरोप आला की त्यांच्या अलिबाग मधील फार्म हाऊसवर ते सध्या आहेत आणि त्यांच्या कुत्र्याला काही लक्षण दिसत आहेत व आपण कृपया तपासणी, उपचारासाठी यावे. तिथे गेल्यावर स्वतः रतन टाटांनी कुत्र्याला धरून तपासणीसाठी आणले. पण तो कुत्रा फार आक्रमक होता. तपासणी सुरू असताना तो त्यांच्या हातातून निसटला आणि काही कळायच्या आत त्याने डॉक्टरांच्या पायाला चावा घेतला.
ते पाहून रतन टाटा अतिशय कळवळले. त्यांनी आधी कुत्र्याला दुसऱ्या रूम मध्ये नेऊन बांधले आणि येताना चक्क हातात ड्रेसिंग चे साहित्य घेऊन आले, अटेंडंटला सोबत पाणी व नॅपकिन घेऊन यायला सांगितले. अटेंडंट ला न सांगता या महान व्यक्तीने स्वतः हातात नॅपकिन घेऊन डॉक्टरांच्या पायाची जखम साफ करायला सुरुवात केली. ( अक्षरशः पाय हातात घेऊन ) इतक्या मोठ्या व्यक्तीचे असे अनपेक्षित वर्तन पाहून आमचे डॉक्टर विस्मयचकित झाले. पण ते नको नको म्हणत असताना त्यांनी पायावरची ती जखम साफ केली, त्याला मलम लावले. त्यावर स्वतःच्या हाताने बँडेज केलं ! याबद्दल काय भावना मांडाव्यात हे सुद्धा शब्दात सुचत नाही.
एकच गोष्ट सांगतो अशी माणसे शेकडो कोटीत एखादीच ! ती त्यांच्या जगण्यातून निव्वळ कसे जगावे याचे उदाहरणच घालुन देत नाहीत तर आपल्यासारख्या शेकडो कोट्यावधी माणसांना स्वतःच्या वर्तनात सुधारण करण्याची सोदाहरण संधी निर्माण करून देतात.
डॉ. वैभव पगार यांची प्रतिक्रिया
या पोस्टवर वैभव पगार यांनी कमेंट केली आहे. त्यांनी रतन टाटांच्या फार्म हाऊसवर घडलेल्या घटनेबद्दल भाष्य करताना म्हटले की, माझ्या आयुष्यातील काही दुर्मिळ आठवणींपैकी ही एक आठवण आहे. या गोष्टीचा माझ्या मनावरती एक ठसा उलटून गेला आणि माझ्या जीवनामध्ये अनेक आमुलाग्र बदल झाले.
आणखी वाचा
मैनु विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल