Share Market Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकानी वधारला. तर, निफ्टीमध्ये 55 अंकाची तेजी दिसून आली आहे. मात्र, थोड्याच वेळात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. त्यानंतर काही वेळेतच बाजार पुन्हा सावरल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समध्ये आजही अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच टाटा स्टीलच्या शेअर दरात घसरण झाली. टाटा स्टीलचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला.
बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकात 41.72 अंकाची घसरण झाली होती. सेन्सेक्स 54,282.92 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 15 अंकाची घसरण झाली असून 16249.95 अंकावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. बाजारात बँकिंग, ऑटो, फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, मेटल, एनर्जी, मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारने मेटलवरील एक्सपोर्ट ड्युटी संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर मेटल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
आज मारुती सुझुकीच्या शेअर दरात 3.08 टक्के, महिंद्राच्या शेअर दरात 2.59 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.82 टक्के, टायटनच्या शेअर दरात 1.66 टक्के, नेस्लेच्या शेअर दरात 1.32 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तर, आयटीसीच्या शेअर दरात 1.93 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 0.56 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. जागतिक शेअर बाजारात मिळालेले सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला होता. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारून बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1500 अंकाची उसळण दिसून आली होती.