Akasa Air : शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांची एअरलाइन कंपनी Akasa Air पुढील महिन्यात आपली व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही व्यावसायिक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. Akasa Air चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे. 


विनय दुबे यांनी सांगितले की, Akasa Air पुढील आठवड्यात नागरीक उड्डयन महासंचालकसह एक उड्डाण फेरी घेणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस व्यावसायिक सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. एअर ऑपरेटरचे प्रमाणपत्र मिळवण्यासह एअरपोर्ट स्लॉटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. दोन ते तीन आठवड्यात एअरलाइन्सची तिकीट विक्री करण्यात येणार आहे. 


Akasa Air चे विनय दुबे यांनी सांगितले की, पहिल्यांदा देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार आहे. वर्ष 2023 मध्ये दुसऱ्या सहामाहीत आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विनय दुबे यांनी सांगितले की, Akasa Air विमान कंपनी  भारतातील मेट्रो शहर टिअर टू आणि टिअर थ्री शहरांवरील उड्डाणांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. 


आगामी 12 महिन्यात 18 विमानांचा ताफा तयार करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. त्यानंतर दरवर्षी 12 ते 14 विमाने ताफ्यात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. 


राकेश झुनझुनवाला यांनी मागील वर्षी विमान वाहतूक सेवेत उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या लक्ष झुनझुनवालांच्या विमान कंपनीच्या वाटचालीवर आहे. अकासा एअरलाइन्सने आपल्या विमान कंपनीकडून  72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. 


 जेट एअरवेज उड्डाणास सज्ज


दरम्यान, तीन वर्षांनंतर जेट एअरवेज पुन्हा एकदा सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीनं दिवाळखोरीमुळे 2019 साली सेवा बंद केली होती. त्यानंतर आता तीन वर्षानंतर जेट एअरवेज उड्डाण घेण्यासाठी सज्ज झालं आहे. कंपनीनं जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्यास सांगितलं आहे. शिवाय कंपनीनं भरतीही सुरु केली आहे. कंपनीनं केबिन क्रूच्या जुन्या कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: