मुंबई : राज्य अन् केंद्र सरकारच्यावतीनं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्यापैकीच एक आहे. ही योजना केंद्र सरकारतर्फे आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे चालवण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी केली जाते.प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतर्फे महिलांना 5000 रुपयांची मदत दिली जाते. मात्र, ही रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर 1 हजार रुपये, गर्भधारणेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर 2 हजार आणि प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंदणी आणि पहिल्या लसीकरणानंतर 2 हजार रुपये मिळतात.
केंद्र सरकारनं 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार ही योजना सुरु करण्यात आली होती.
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेवरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत महिलांना तीन टप्प्यांमध्ये 5 हजार रुपये मिळतात.
महाराष्ट्रात किती महिलांना लाभ मिळाला?
प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्तपणे ही योजना राबवली जाते. महाराष्ट्रातील 8 लाख 37 हजार 399 गर्भवती महिला व मातांनी याचा लाभ जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान घेतला आहे. तर, 2017 पासून 2022 पर्यंत 34 लाख 9 हजार 449 महिलांना याचा लाभ मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा अर्ज कुठं करणार?
प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास संबंधित महिलेचं वय 19 वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यावेळी महिला गर्भवती असणं आवश्यक आहे. ज्या महिला शासकीय किंवा खासगी क्षेत्रात नियमित नोकरी करतात त्यांना याचा लाभ मिळत नाही. याशिवाय ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात त्यांना याचा फायदा मिळत नाही.
गर्भवती महिलेचं आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड, गर्भवती महिलेंच पासबुक अन् पासपोर्ट साईजचा फोटो ही कागदपत्रं असणं आवश्यक आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सिटीझन लॉगीन पर्यायावर क्लिक करुन नोंदणी करुन अर्ज दाखल करावा. याशिवाय नागरी सुविधा केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील या योजनेसंदर्भात माहिती उपलब्ध होईल.
इतर बातम्या :