PM Ujjwala Yojana:  स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Price) सातत्याने महाग होत असल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आता केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या विक्रीबाबत महत्त्वाची आकेडवारी जाहीर केली आहेत. मागील पाच वर्षात उज्ज्वला योजनेतील (Pradhan Mantri Ujjwala Yojana) जवळपास 4.13 कोटी लाभार्थ्यांनी दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर मागवलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. 


केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत लेखी माहिती दिली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी सरकारला उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांनी मागील पाच वर्षात एलपीजी गॅस सिलिंडर एक अथवा त्यापेक्षा कमी सिलिंडर रिफील न करणाऱ्याबाबत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना रामेश्वर तेली यांनी सांगितले, मागील पाच वर्षात उज्ज्वला योजनेच्या 4.13 कोटी लाभार्थ्यांनी एकदाही सिलिंडर दुसऱ्यांदा भरला नाही. त्यांनी सांगितले की 7.67 कोटी लाभार्थ्यांनी फक्त एकदाच एलपीजी सिलिंडर दुसऱ्यांदा भरला.  


रामेश्वर तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरची विक्री ही लोकांच्या आहाराच्या सवयी-पद्धती, घरात राहणारे एकूण सदस्य आणि इंधनाचे इतर पर्यायांवर अवलंबून असते. वर्ष 2021-22 मध्ये एकूण 30.53 कोटी सक्रिय एलपीजी ग्राहकांपैकी 2.11 कोटी जणांनी एलपीजी सिलिंडर दुसऱ्यांदा भरला नाही. तर, 2.91 कोटी एलपीजी ग्राहकांनी फक्त एकदाच गॅस सिलिंडर भरला आहे. 


पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलत राहतात आणि अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: