PM Internship Scheme: केंद्र सरकारनं युवकांसाठी एक मोठी योजना सुरु केली आहे.  21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील 500 नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात आली आहे. 10वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी सरकारनं पीएम इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरु केली आहे. 12 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जाणून घ्या या योजनेची सविस्तर माहिती. 


वर्षभर मिळणार 5000 रुपये स्टायपेंड 


या योजनेत निवडलेल्या उमेदवारांना केंद्र सरकार आणि कंपनी या दोन्हीकडून भत्ता मिळेल. जिथे केंद्र सरकार इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक इंटर्नला दरमहा 4500 रुपये स्टायपेंड देईल. त्याच वेळी, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत, संबंधित कंपनी इंटर्नला 500 रुपये अतिरिक्त भत्ता देईल. एक वर्षाच्या इंटर्नशिपनंतर प्रमाणपत्र दिले जाईल आणि कंपनीत जागा रिक्त राहिल्यास तरुणांना तेथे कायमस्वरूपी नोकरीही मिळेल.


कुठे कराल अर्ज?


या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबरपासून अधिकृत वेबसाइट pminternship.mci.gov.in द्वारे अर्ज करू शकतील. 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इंटर्नशिप दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, टोल फ्री क्रमांक 1800-116-090 सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीतील वातावरणाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करता येईल आणि इंटर्नशिप दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, ज्याचे विहित वेळेत निराकरण केले जाईल.


अर्ज करण्यासाठी कोण पात्र?


21 ते 24 वयोगटातील तरुण जे पूर्णवेळ कुठेही नोकरी करत नाहीत ते यासाठी अर्ज करू शकतात. ज्या तरुणांचे कौटुंबिक उत्पन्न वर्षाला 8 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे पालक किंवा पती/पत्नी सरकारी नोकरीत आहेत किंवा पूर्णवेळ शिक्षण अभ्यासक्रम शिकत आहेत ते अर्ज करू शकणार नाहीत. ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.


एक कोटी तरुणांना लाभ मिळणार


केंद्र सरकारच्या या योजनेमुळे येत्या 5 वर्षांत देशातील एक कोटी तरुणांना नामवंत कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्येच 1,25,000 तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. केंद्र सरकारचे आरक्षण धोरण संपूर्ण योजनेत लागू राहील.


काय आहे पात्रता?


ITI, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा BA, B.Sc., B.Com, BCA, BBA, B. फार्मा केलेले 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील. आयआयटी, आयआयएम, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएसईआर, एनआयटी आणि ट्रिपल आयटी यांसारख्या संस्थांमधून पदवी प्राप्त केलेले तरुण अर्ज करू शकणार नाहीत. ज्यांच्याकडे CA, CS, MBBS, BDS, MBA किंवा इतर व्यावसायिक पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक आहे त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.


हे उमेदवार अर्ज करु शकणार नाहीत


केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कौशल्य प्रशिक्षण, इंटर्नशिप किंवा विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग असलेले तरुण या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. ज्या युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण कार्यक्रम किंवा राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेंतर्गत कोणत्याही वेळी प्रशिक्षण घेत आहेत ते देखील अर्ज करू शकणार नाहीत.


महत्वाच्या बातम्या:


शेतकर्‍यांसाठी देशातील सर्वात मोठ्या सोलर जनरेशन योजनेचा नागपुरात शुभारंभ; काय आहेत नेमके वैशिष्ट्य?