Petrol Diesel Price :  भारतात  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार की आणखी महागणार याचे संकेत एका बैठकीतून मिळणार आहे. जगभरातील तेल उत्पादक देशांची  ( Oil Producing Nations) संघटना ओपेक प्लसची  ( Opec+) मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.  या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. 


या बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादना चार लाख बॅरल प्रति दिवस वाढवण्यावर मंजुरी देण्यात येऊ शकते. ओपेक प्लस देशांच्या संघटनेने म्हटले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा कच्च्या तेलाच्या मागणीवर फार मोठा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे मागणीत घट होईल याची शक्यता कमी आहे. ओपेक प्लस गटाकडून कच्च्या तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. 


मार्च 2020 मध्ये कोरोना महासाथीच्या काळात उत्पादनात घट


मार्च 2020 मध्ये जगभरात सुरू असलेल्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट झाली होती. त्यानंतर ओपेक प्लस संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनात 10 दशलक्ष बॅरल इतकी कपात केली होती. ऑगस्ट महिन्यानंतर कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्यात आली होती. आतापर्यंत 5.8 दशलक्ष बॅरलचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले. तर, उर्वरित चार लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा सुरू करण्यात येऊ शकते. 


भारताला होणार फायदा ?


कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायचे ठरवले तर त्याचा सर्वाधिक फायदा भारताला होईल असे म्हटले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी लोक हैराण झाले आहेत. कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने किंमती खाली येतील, त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. अमेरिका आणि भारतासह अनेक देश ओपेक प्लस देशांकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची मागणी करत आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळ आहे. 


OPEC Plus ही 23 देशांची संघटना आहे, ज्याचे नेतृत्व सौदी अरेबिया आणि रशिया करत आहेत.