Petrol Diesel Price Today 1st November 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे एक नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कपात होईल अशी चर्चा सुरू होती. काही वृत्तांमध्ये 40 पैसे प्रति लिटर दर कपात होणार असल्याचे म्हटले जात होते. टप्प्याटप्प्याने ही दर कपात लागू होणार होती. या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today) दर जाहीर केले. मंगळवारी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.
देशात 22 मे नंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. पाच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहे. तर, दुसरीकडे राज्यात जुलै महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्य सरकारने कर कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली होती.
कच्च्या तेलाच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी सकाळी WTI क्रूड ऑईलचा दर 86.04 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 94.83 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने या महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील कच्च्या तेलाच्या मागणीच्या दोन टक्के इतकी कपात असणार आहे. येत्या काही दिवसात ही कपात लागू होणार आहे.
चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोलकात्यात 106.03 रुपये प्रति लिटर, मुंबईत 106.31 रुपये प्रति लिटर आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर इतका आहे. डिझेलच्या दरातही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे दिल्लीत 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत 97.28 रुपये प्रति लिटर, चेन्नईत 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये 92.76 रुपये प्रति लिटर इतका दर आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर