Petrol Diesel Price Hike : साडेचार महिन्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. मंगळवार सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर जारी होणार आहेत. पेट्रोल पंप, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरने किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).