Mutual Funds SIP : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) म्हणजे सेबी (SEBI) सर्वसामान्यांना म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणुकीशी जोडण्यासाठी नवीन योजना आखत आहे. सेबी लवकरच 250 रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (SIP) सुरु करण्याची योजना आणणार आहे. बाजार नियामक सेबीने देशातील प्रत्येक व्यक्तीला म्युच्युअल फंड गुंतवणुकीशी जोडण्याचा प्लॅन तयार केला आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.


SIP मध्ये 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार


सेबी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. यासाठी सेबीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची मर्यादा 250 रुपये करायच्या विचारात आहे. असे झाल्यास अगदी सामान्य लहानात-लहान गुंतवणूकदारही दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIP) द्वारे सहज गुंतवणुक करू शकतो. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमादरम्यान या योजनेची माहिती दिली आहे.


म्युच्युअल फंड उद्योग आता 50 ट्रिलियन रुपयांचा


अलिकडे म्युच्युअल फंड उद्योग 50 ट्रिलियन रुपयांचा झाला आहे. माधवी पुरी बुच यांनी सांगितलं की, म्युच्युअल फंडातील छोट्या गुंतवणुकीच्या योजना प्रत्येक व्यक्तीला आर्थिक व्यवस्थेशी जोडण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे भारतीय शेअर बाजाराचाही विकास होईल. त्यामुळे, सेबी म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांसह 250 रुपयांच्या एसआयपी (SIP) सुरु करण्याच्या विचारात असून सर्व शक्यता तपासत आहे. ही SIP योजना अस्तित्वात आणण्यासाठी सेबी सर्वतोपरी प्रयत्न आणि मदत करण्यास तयार आहे.


सध्या SIPची किंमत 500 रुपयांपासून सुरू


सध्या काही म्युच्युअल फंडांमध्ये 100 रुपयेही गुंतवण्याची संधी आहे. पण, त्यात इतके कमी पर्याय आहेत की, ते लोकप्रिय होऊ शकले नाही. सध्या सर्वात लहान एसआयपी 500 रुपयांपासून सुरु होते. याशिवाय सेबी उच्च जोखमीच्या गुंतवणूकदारांना संधी देण्यासाठी एक नवीन मालमत्ता वर्ग तयार करणार आहे.


नोव्हेंबरमध्ये एसआयपी गुंतवणूक विक्रमी उच्चांक गाठली


सध्या बहुतेक लोक SIP गुंतवणुकीचा पर्याय निवडताना दिसत आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, SIP द्वारे गुंतवणूक नोव्हेंबर 2023 मध्ये विक्रमी उच्चांक गाठली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे पहिल्यांदाच 17,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीला गुंतवणूकदारांची पसंती मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये उघडलेल्या 14.1 लाख नवीन खात्यांमुळे, SIP खात्यांची संख्या 7.44 कोटी झाली आहे, ही ऐतिहासिक उच्च पातळी आहे.