Rules changes from 1st December 2022: नोव्हेंबरचा महिना संपण्यास काही तासांचा अवधी असून उद्यापासून डिसेंबरचा महिना सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही बदल होणार आहेत. या बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर, बजेटवर होणार आहे. डिसेंबर महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत.

  


हयातीत असल्याचा दाखला


पेन्शन घेणाऱ्यांना हयातीत असल्याचा दाखला सादर करावा लागतो. त्यासाठी शेवटची मुदत 30 नोव्हेंबर 2022 होती. या मुदतीत तुम्ही हयातीत असल्याचा दाखल सादर न केल्यास एक डिसेंबरपासून पेन्शन मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. 


एलपीजी गॅस सिलेंडर दर


गॅस कंपन्यांकडून दर महिन्यांच्या पहिल्या तारखेस एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात येतो. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल दिसून येऊ शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे एक डिसेंबर रोजी एलपीजी गॅसच्या दरात काय बदल होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलणार


एक डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. एटीएममधून रक्कम काढताना होणारी फसवणूक टाळण्याच्यादृष्टीने पंजाब नॅशनल बँकेकडून उद्यापासून एटीएममधू पैसे काढण्याची प्रक्रिया बदलली जाऊ शकते. यामध्ये मोबाईलवर ओटीपी येईल, त्यानंतर ग्राहकांना पैसे काढता येतील. 


डिजीटल रुपी


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 1 डिसेंबरपासून रिटेलसाठी डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली आहे. किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला प्रोजेक्ट आहे. या दरम्यान, ई-रुपीचे वितरण  आणि वापरासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 


13 दिवस बँक हॉलिडे


डिसेंबर महिन्यात तुमच्याकडे बँकेशी निगडित काही कामे असतील तर बँकांच्या कामकाजाचे दिवस लक्षात ठेवा. डिसेंबर महिन्यात बँकांना 13 दिवस सुट्टी आहे. राज्यनिहाय या सुट्ट्यांमध्ये बदल होईल. 


सीएनजी-पीएनजी दर 


दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरात बदल होतो. मागील काही दिवसात सीएनजीचे दर वाढसे आहेत. त्यामुळे उद्या सीएनजी दरात बदल होणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 


रेल्वेची वेळ


डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढतो. थंडीत वाढणाऱ्या धुक्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होतो. काही रेल्वे गाड्या रद्द होतात. डिसेंबर महिन्यात काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल संभवतात. रेल्वे प्रवास करणार असाल तर ही बाब लक्षात घ्यावी.