Ola Electric IPO News : नवीन वर्षात गुंतवणूकदारांसाठी (Investors) आणखी नव्या संधी उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाजारात दमदार आयपीओ (IPO) दाखल होणार आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करुन भरघोस नफा कमावण्याची संधी मिळणार आहे. ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीचा आयपीओ (IPO) 2024 वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. कपंनीने सेबीकडे (SEBI) ड्राफ्ट कागदपत्रे जमा केली आहेत.


लवकरच ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ बाजारात येणार


ओला इलेक्ट्रिकने 22 डिसेंबर रोजी ड्राफ्ट पेपर ऑफ इंडिया सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाकडे दाखल केला आहे. त्यामुळे, ओला इलेक्ट्रिक नववर्षात आयपीओ आणणार आहे. ओला इलेक्ट्रिक आपला IPO लाँच करणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी ठरणार आहे. या IPO द्वारे, ओला इलेक्ट्रिक कंपनीने बाजारातून 7,250 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल या IPO मध्ये 4.74 कोटी शेअर्स विकण्याच्या विचारात आहेत.


आयपीओकडून किती मूल्यांकन अपेक्षित?


ओला इलेक्ट्रिक 2024 च्या सुरुवातीला आपला IPO लाँच करू शकते. यासाठी कंपनीने 22 डिसेंबर रोजी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला आयपीओ आणण्यात यश आले तर 2003 नंतर पहिल्यांदाच एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होईल. यापूर्वी 2003 मध्ये मारुती सुझुकीचा IPO आला होता. कंपनीला या IPO मध्ये एकूण 7 ते 8 अब्ज डॉलर्सचे मूल्य अपेक्षित आहे.कंपनीने अद्याप किंमत बँड निश्चित केलेला नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPO सबस्क्रिप्शनची तारीख 2024 च्या सुरुवातीस जाहीर केली जाऊ शकते.


IPO बाबत अधिक माहिती


लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक कंपनी या आयपीओ (IPO) द्वारे 5,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. एकूण 95,191,195 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील, या शेअर्सचे दर्शनी मूल्य (Face Value) 10 रुपये प्रति शेअर आहे. यातून 1750 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. या IPO मध्ये, 75 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव ठेवण्यात आला आहे. तर 15 टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी आणि 10 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.


IPO द्वारे उभारलेल्या निधीचे कंपनी काय करणार?


SEBI कडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनी IPO द्वारे उभारलेल्या रकमेपैकी 1,226.4 कोटी रुपये ओला सेल टेक्नॉलॉजीजच्या कारखाना प्रकल्पासाठी वापरणार आहे. संशोधन आणि विकासासाठी 1600 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. कंपनीच्या सामान्य व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी अंदाजे 350 कोटी रुपये वापरले जातील. यातील काही रक्कम कंपनी 800 कोटी रुपयांचे जुने कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 335 दशलक्ष डॉलर होता, या वर्षात 136 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं.


(टिप : वरील तपशील केवळ माहितीसाठी वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आयपीओ मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शेअर मार्केट संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


SIP Investment : एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात? तर त्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या!