Income Tax Return Last Date : अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर लवकर भरून घ्या. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची  शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.  त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. आयकर विभागाकडून 31 जुलै पर्यंत आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापर्यंत ITR भरला नाही तर पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. 


तज्ज्ञांच्या मते,31 जुलै 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरला तर  31 डिसेंबर २०२२ पर्यंत देखील भरता येईल. परंतु, त्यासाठी करदात्यांना पाच हजार रूपयांचे  विलंब शुल्क भरावे लागेल. तर  पाच लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना हे विलंब शुल्क एक हजार रूपये असणार आहे.  


31 जुलैपर्यंत सुमारे सात कोटी आयटीआर भरण्याचे लक्ष्य होते. मात्र 28 जुलैपर्यंत हा आकडा पाच कोटीपर्यंत देखील पोहोचला नाही. त्यातच आता आयटीआर भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिल्यामुळे पोर्टलवरील भार वाढू शकतो. त्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता आहे. असे झाले तर ज्यांना आयटीआर भरता आला नाही त्यांना पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वेळेवर आयटीआर भरण्याचे आवाहान आयकर विभागाकडून करण्यात येत असते.  


आयकर विभागाकडून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. 2022-23 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 असून तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर भरला नसेल तर तो त्वरित भरून घ्या आणि विलंब शुल्क टाळा, असे आवाहन आयकर विभागाकडून ट्विटच्या माध्यमातून करण्यात आले आहे.