Health Insurance Rule Change : भविष्याचा आणि आजारपणाच्या संकटाचा विचार करता आपण आरोग्य विमा (Health Insurance) काढतो. विमा कंपनी (Insurance Company) आपल्या ग्राहकांना आरोग्य आणि जीवनासाठी संरक्षण देते. आता आरोग्य विमाधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आरोग्य विमा पॉलिसीधारक (Health Insurance Policy) आता कोणत्याही रुग्णालयातून कॅशलेस उपचार घेऊ शकणार आहे. पॉलिसीधारकांचं जीवन अधिक सोपं होणार आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (GIC) पॉलिसीधारकांचे जीवन सुखकर करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. विमा कंपनीच्या नेटवर्कबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या पॉलिसीधारकांवरील ओझे कमी करण्यासाठी, जनरल इन्शुरन्स कौन्सिलने बुधवारी, 25 जानेवारी रोजी सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांशी सल्लामसलत करून 'कॅशलेस एव्हरीव्हेअर' उपक्रम सुरू केला आहे. 'कॅशलेस एव्हरीवेअर' (Cashless Everywhere) म्हणजेच सर्वत्र कॅशलेस. 


हेल्थ इन्शुरन्सद्वारे कोणत्याही हॉस्पिटलमधून कॅशलेस उपचार


आतापर्यंत, आरोग्य विमा पॉलिसीधारकाला फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्येच कॅशलेस उपचार मिळू शकत होते. ज्या रुग्णालयासोबत संबंधित विमा कंपनीने करार केला आहे, त्याचं रुग्णालयात कॅशलेस उपचार उपलब्ध होते. जर ते नॉन-नेटवर्क हॉस्पिटल असेल, तर पॉलिसीधारकाला त्याच्या खिशातून संपूर्ण रक्कम भरावी लागायची आणि नंतर क्लेम रिइम्बर्समेंट प्रक्रियेतून जावं लागयचं. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांशी सल्लामसलत करून सर्व हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचारांचा विस्तार करण्यासाठी 'कॅशलेस एव्हरीव्हेअर' सुरू केलं आहे. आरोग्य विम्यासंदर्भातील नवीन नियम काय आहे? जाणून घ्या.


कॅशलेस एव्हरीवेअर उपक्रमाची घोषणा


जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) च्या या उपक्रमाचा उद्देश पॉलिसीधारकांसाठी उपचार आणि पेमेंट अधिक सुखकर करणे हा आहे. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे अध्यक्ष तपन सिंघल यांनी गुरुवारी या उपक्रमाची घोषणा करताना सांगितलं की, 'कॅशलेस एव्हरीवेअर' (Cashless Everywhere) या उपक्रमामुळे विमा कंपनीच्या वैद्यकीय केंद्रांच्या यादीबाहेरील वैद्यकीय केंद्रांमधून उपचार घेणं सोपे होईल. 


कॅशलेस एव्हरीव्हेअरबाबत अधिक माहिती


'कॅशलेस एव्हरीव्हेअर' या उपक्रमामुळे पॉलिसीधारकांना कोणत्याही रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार घेण्याची सोय आणि स्वातंत्र्य मिळते


हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीधारक विमा कंपनीच्या नेटवर्क अंतर्गत रुग्णालयांचा विचार न करता कोणत्याही रुग्णालयातून उपचार घेऊ शकतात.


पॉलिसीधारकांना कोणतेही पैसे न भरता कोणत्याही रुग्णालयात दाखल करता येईल आणि विमा कंपनी उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरच बिल भरेल.


याचा सर्वाधिक फायदा पॉलिसीधारकांना होईल, कारण त्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल.


हेल्थ इन्शुरन्स दाव्यांची प्रक्रिया सुलभ करणे, फसवणूक कमी करणे आणि पॉलिसीधारकांचा विश्वास मजबूत करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.