Share Market : हा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ट्रेडिंग करण्याआधी ही बातमी एकदा जरुर वाचा. कारण होळी निमित्त शुक्रवारी 18 मार्च रोजी बाजारपेठा बंद राहतील.  त्यामुळे या आठवड्यात केवळ चार दिवसच ट्रेडिंग असेल. शिवाय रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदरांबाबतचा निर्णय आणि देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारी या आठवड्यात शेअर बाजाराची दिशा ठरवेल, अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.


बाजारातील अस्थिरता तूर्त तरी कायम राहणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. याबाबत फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक, रशिया-युक्रेन संघर्ष या आठवड्यात बाजारासाठी महत्त्वपूर्ण जागतिक घटक असतील. रशिया-युक्रेन तणावाबाबत अजूनही अनिश्चितता आहे, असं संतोष मीना, स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख यांनी पीटीआयला सांगितले.


फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी येतील. या सर्व घडामोडींमध्ये कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन भारतीय बाजारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल आणि महागाईची आकडेवारी 14 मार्चला म्हणजे सोमवारी येईल.


हा आठवडा कमी ट्रेडिंग सत्रांचा असेल. सोमवारी औद्योगिक उत्पादन (IIP) डेटावर बाजारातील सहभागी प्रतिक्रिया देतील. त्याचप्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईची आकडेवारीही येणार आहे. यूएस मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी जाहीर होतील. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील, असं रेलिगेअर ब्रोकिंग रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी विश्लेषण केलं आहे.


गेल्या आठवड्यात, मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,216.49 अंकांनी किंवा 2.23 टक्क्यांनी वधारला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 385.10 अंकांनी किंवा 2.37 टक्क्यांनी वाढला.


विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि आता रशिया-युक्रेनमधील तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ, अर्थव्यवस्थेवरील महागाईच्या दबावावर रिझर्व्ह बँकेची प्रतिक्रिया आदींवर आता बाजाराची नजर असेल. हे अनुकूल होईपर्यंत बाजार अस्थिर राहील असं मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितलं.


रुपयातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भूमिकेचाही बाजाराच्या दिशेवर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.


 सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांच्या म्हणण्यानुसार, रशिया-युक्रेन युद्ध आणि यूएस मध्यवर्ती बँकेची बैठक या आठवड्यातील बाजारासाठी महत्त्वाच्या घडामोडी आहेत. देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारीही बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाची ठरेल.


महत्वाच्या बातम्या


SEBI: सोशल मीडियावरून शेअर मार्केट गुंतवणुकीच्या टिप्स; सेबीकडून मोठी कारवाई


Election Result Share Market : विधानसभा निवडणूक निकालाचा असा झाला होता शेअर बाजारावर परिणाम