Pepsico Layoffs 2022 : पेप्सिको (Pepsico) कंपनी फूड इंडस्ट्रीमधील दिग्गज कंपनी आहे. ही शीतपेये (Beverages) सेक्टरमधील बनवणारी आघाडीची कंपनी आहे. आता ही कंपनी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. ट्विटर, ॲमेझॉन, मेटा नंतर पेप्सिको कंपनी नोकरकपात करणार आहे. वॉल स्ट्रिटच्या रिपोर्टनुसार, पेप्सिको कंपनी आर्थिक मंदीचा संभाव्य धोका पाहता अनेक कर्मचाऱ्यांना हटवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे येत्या काळात पेप्सिको कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी दिग्गज टेक कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.


पेप्सिको कंपनी सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता


वॉल स्ट्रिट जर्नल वृत्तपत्राच्या (The Wall Street Journal) रिपोर्टनुसार, पेप्सिको कंपनी सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबतीत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वॉल स्ट्रिट जर्नलने याआधीही दावा केला आहे की, येत्या काळात विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नोकरकपातीचं सत्र सुरु झालं आहे. सर्वात आधी मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं. त्यानंतर ॲमेझॉन, ट्विटर, मेटा, ॲपल या टेक कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला.


पेप्सिको कंपनीच्या 'या' निर्णयामागील कारण काय?


पेप्सिको आपल्या कंपनीत काम करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी तंत्रज्ञान आणि मीडिया विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याची शक्यता आहे. या नोकरकपातीमध्ये पेय विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल कारण स्नॅक्स विभागामध्ये यापूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. 


जगभरातील मंदीची भीती


पेप्सिको कंपनी चिप्स, क्वेकर ओट्स, डोरिटोस आणि कोल्ड ड्रिंक्स सारख्या अनेक गोष्टीचं उत्पादन करते. पेप्सिको कंपनीच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत जगभरात सुमारे 3,09,000 कर्मचारी कार्यरत आहेत. फक्त अमेरिकेमध्ये पेप्सिको कंपनी 1.29 लाख लोकांना रोजगार देते. अमेरिकेत मंदीची भीती सतत वाढत आहे. यामुळे देशातील सर्व मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. कंपन्या कर्मचाऱ्यांनी संख्या कमी करून कंपनीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासोबतच कंपन्यांनी नवीन कर्मचारी भरतीही थांबवली आहे. 


पेप्सिको कंपनीबद्दल माहिती


पेप्सिको कंपनी अमेरिकन फूड अँड बेवरेजेस कंपनी आहे. ही फूड व्यवसायातील दिग्गज कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 1898 साली झाली. आता या कंपनीला 124 वर्ष झाली आहेत. पेप्सिको कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. पेप्सी, मॉऊंटन ड्यू, लेस पोटॅटो चिप्स, ट्रॉपिकाना, डोरिटोस, लिपटन ग्रीन टी, चितोस, मिरींडा ही पेप्सिको कंपनीची प्रसिद्ध उत्पादने आहेत.