Paytm Crisis : आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) कारवाई केली असली तरीही पेटीएमच्या शेअर्समध्ये (Paytm Share) गेल्या तीन सत्रांमध्ये तेजी असल्याचं दिसून आलंय. सलग तीन सत्रांमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये एकूण 15 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. 


आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली होती. परंतु गेल्या तीन दिवसांपासून गुंतवणूकदारांनी या समभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं दिसून येतंय. RBI ने पेटीएम बँकेला मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर पेटीएमने अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank)केलेला करार आणि बर्नस्टीनचे रेटिंगसंबंधित बातम्या यामुळे या शेअर्सची खरेदी करण्याकडे लोकांचा पुन्हा एकदा कल असल्याचं दिसून येतंय. पेटीएमचा शेअर मंगळवारी 376.25 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर 5 टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली होती.


ईडीच्या तपासात अद्याप काहीही आढळले नाही


अलीकडेच पेटीएमला दिलासा देत आरबीआयने ठेवी स्वीकरण्यास बंदी घालण्याची मुदत 29 फेब्रुवारीवरून वाढवली असून ती 15 मार्च अशी केली आहे. याशिवाय फेमा कायद्याच्या (Foreign Exchange Management Act) उल्लंघनाचा तपास करणाऱ्या ईडीला पेटीएम कंपनीविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत असा दावा सोमवारी विविध प्रसारमाध्यमांच्या अहवालात करण्यात आला. गेल्या आठवड्यात, वन 97 कम्युनिकेशन्सने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेला दिले होते. त्यामुळे त्यांच्या क्यूआर कोड, साउंड बॉक्स आणि कार्ड मशीनवरील संकटही टळले असून ते कायम कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. 


शेअर्स 600 रुपयांचा आकडा गाठण्याचा अंदाज


पेटीएमचे संस्थापक आणि एमडी विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) सतत कंपनीचा बचाव करत होते. व्यापाऱ्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने कंपनीचे शेअर्स 600 रुपयांचा आकडा गाठण्याची आशा व्यक्त केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवरील बंदीबाबत आरबीआयने अलीकडेच FAQ जारी केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होत असल्याचं दिसून येतंय.


Disclaimer: येथे दिलेली बातमी केवळ माहितीसाठी दिली जात आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या. ABP माझा कधीही कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.


ही बातमी वाचा: