मुंबई: देशातील मर्चंट पेमेंट्सच्या (Merchant Payments) बाबतीत पेटीएमला (Paytm) सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलं आहे. देशातील 76 टक्‍क्यांहून अधिक मर्चंट पेमेंट्स हे पेटीएमच्या माध्यमातून केले जात असल्याचं डॅटमने नुकतेच केलेल्‍या सर्वेक्षणामधून निदर्शनास आलं आहे. भारतातील क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स आणि मोबाइल पेमेंट्समध्‍ये अग्रणी असलेली आघाडीची आर्थिक सेवा कंपनी पेटीएम मर्चंट पेमेंट्ससाठी अव्‍वल पसंती म्‍हणून कायम आहे. 


आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मर्चंट्सच्‍या पेमेंट्स स्‍वीकारण्‍याच्‍या पद्धतींवर वेगवेगळे परिणाम झाले. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या मर्चंट्सपैकी बहुतांश 59 टक्‍के मर्चंट्सनी कोणताही परिणाम न झाल्‍याचे सांगितले आणि पेटीएमचा वापर कायम ठेवला आहे. 


देशातील 12 शहरांमध्ये सर्व्हे करण्यात आला


डॅटमच्या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, 58 टक्‍के मर्चंट्सनी पेटीएम अॅपला (Paytm Merchant Payments) पसंती दिली. त्यानंतर फोनपे (23 टक्‍के), गुगल पे (12 टक्‍के) आणि भारतपे (3 टक्के) यांचा क्रमांक होता. यामधून डिजिटल पेमेंट्समध्‍ये पेटीएमचे प्रभुत्‍व दिसून येते.


सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या मर्चंट्सपैकी 39 टक्‍के मर्चंट्स पेमेंट्ससाठी पेटीएम साऊंडबॉक्‍सचा वापर करतात, तर 5 टक्‍के मर्चंट्सनी पेटीएम अॅपच्‍या माध्‍यमातून कर्ज घेतले आहेत. एकूण मर्चंट्सवरील परिणाम मर्यादित आहे आणि पेटीएम कोणतेही नुकसान कमी करण्‍यासाठी त्‍यांच्‍याशी सक्रियपणे संलग्‍न आहे. या सर्वेक्षणामध्‍ये भारतातील 12 शहरांमधील पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासाठी पेटीएम अॅप्‍सचा वापर करणाऱ्या 2,000 मर्चंट्सचा समावेश होता.


पेटीएमची अॅक्सिस बँकेशी भागिदारी


पेटीएमने मर्चंट पेमेंटच्या सेटलमेंटसाठी ॲक्सिस बँकेशी भागीदारी केली आहे. One97 Communications ने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केले आहे आणि त्या बँकेत एस्क्रो खाते उघडले आहे. त्यामुळे या पुढेही आपली सेवा कार्यरत ठेवण्यासाठी पेटीएमसमोर कोणतीही अडचण येणार नाही. 


पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्चनंतरही कार्यरत 


Axis Bank मध्ये नोडल खाते हस्तांतरित केल्यानंतर पेटीएमचे मर्चंट पेमेंट सेटलमेंट पूर्वीप्रमाणेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय होत राहतील. पेटीएम ॲप, पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्चनंतरही सर्व व्यापारी भागीदारांसाठी नेहमीप्रमाणे काम करत राहतील. पेटीएमच्या मते, पेटीएम पेमेंट्स बँक व्यतिरिक्त कोणत्याही बँक खात्याशी लिंक केलेले फंड व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना व्यत्ययाची काळजी करण्याची गरज नाही.


ही बातमी वाचा: